पारोळा येथे कापूस जिनिंगला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 03:59 PM2019-02-27T15:59:14+5:302019-02-27T15:59:38+5:30
अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान
पारोळा - येथील पारोळा-अमळनेर रस्त्यावर असलेल्या रोहित जिनिंगला बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे ५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जीन मालक अनिल सोमाणी यांनी दिली. नेमकी आग कशा मुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.
२७ रोजी दुपारी रोहित जिनिंग आणि प्रेसिंगमध्ये सर्वत्र काम सुरू होते. दुपारी अचानकपणे १ वाजता जिनिंगच्या दर्शनी भागात असलेल्या कापसाच्या ढिगाला आग लागली आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. त्यावेळी जिनिंग परिसरात असलेल्या पाण्याचा मारा करून कामगार आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र हवेमुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. त्या वेळी येथे असलेला पाच हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी सापडला.
या वेळी पारोळा, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, एरंडोल येथील अग्निशमन बंब तसेच गावातील खाजगी पाणी पुरवठा करणारे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र हवा जोरात असल्याने आग विझविण्यासाठी अडचण निर्माण होते होती.
या आगीत दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जळून खाक झाले. जिनिंगचा बाजूला मजुरांची घरेही आगीत सापडली. प्रचंड धुराचे लोट असल्याने या मजुरांनी आपल्या घरातील साहित्य कसेबसे बाहेर काढले व झाडा खाली आश्रय घेतला. या वेळी दुसऱ्या एका जिनिंगचे मालक दयाराम बळीराम पाटील, सुधाकर पाटील आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली.
आगीचे वृत्त समजताच प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोहेकाँ प्रकाश चौधरी, सत्यवान पाटील यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
छाया - पारोळा येथे कापसाला लागलेली आग विझविताना नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात या आगीत जळून खाक झालेले ट्रॅक्टर.