कापूस वेचाले चाल वं सोनी गाण्याने लावले वेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:49 PM2020-11-22T13:49:09+5:302020-11-22T13:50:47+5:30
गीताच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न परिणामकारक ठरत आहे.
जामनेर, जि.जळगाव : शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीची लगबग असून मजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच " कापूस वेचाले चाल वं सोनी " हे खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जात आहे. या गीताच्या माध्यमातून वाकी, ता.जामनेर येथील लोकगीत कलावंत अण्णा सुरवाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न परिणामकारक ठरत आहे.
कापूस वेचाले चाल व सोनी हे गीत सध्या यु ट्यूबवर धूम करीत आहे. शांताराम साळुंके हे गीतकार असून अण्णा सुरवाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पोलीस सेवेत कार्यरत असलेले केकतनिंभोरे, ता. जामनेर येथील प्रकाश जोहरे यांनी संगीताची साथ दिल्याने गीताचा गोडवा वाढला आहे. जामनेर येथील मिलिंद लोखंडे यांच्या जी.एम.म्युझिक स्टुडिओमध्ये मनोज दुसाने यांनी गाण्याचे रेकोर्डिंग केले.
या लोकगीतांची संकल्पना नीलकंठ पाटील यांची असून कुणाल थेटे व योगेश बाविस्कर यांच्या कुशल दिग्दर्शनाची जोड लाभली आहे. जी.एम चॅनेलचे मिलिंद लोखंडे यांच्या प्रयत्नातून गीताला मोठा प्रतिसाद मिळाला.
या कलावंताचा सहभाग
सोनाली बेहेरे(सोनी), रजनी साळुंके, भीमा शिंदे, गोविंद मोरे, उमेश मोरे यांच्यासह पिंपळकोठा ग्रामस्थांनी भूमिका साकारल्या आहेत. सनलाईट फिल्मचे नीलेश सपकाळे यांचे छायाचित्रण व मनोज दुसाने यांचे व्हिडीओ एडिटिंग गाण्याची परिणामकारकता वाढवते.