कापसाचे दर ६६०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:58+5:302021-03-08T04:15:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कापसाच्या दरात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली असून कापसाचे दर प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच घाटावरील कापसाला ६,७०० पर्यंत भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली असून, भारतीय गठाणचे दर ४६ हजारपर्यंत गेले आहेत. त्यातच पाकिस्तानकडून ही भारतीय कापसाची मागणी केली जात असून, पाकिस्तानला ही कापूस निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेच्या ट्रेंड वॉरचा परिणाम असल्याने खासगी बाजारात कापसाला जास्त भाव नव्हता. त्यातच हमी भाव ५,८०० असला तरी ग्रेड पद्धतमुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच नाही. त्यातच गेल्यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांनी भाव वाढीची वाट न पाहता आपला माल विक्री करून टाकला; मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव आला असून कापसाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे मालच शिल्लक नाही. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असल्याने त्यांना या भाव वाढीचा फायदा होऊ शकतो.
भाव वाढीचे कारण
१) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर हे न्यूयॉर्क बाजारावरून ठरतात. सेंट ची किंमत वाढली तर भाव वाढतात. नोव्हेंबर मध्ये सेंटची किंमत ६६ इतकी होती. मात्र, त्यानंतर भाव वाढत गेले. २५ फेब्रुवारीला ९५.५७ सेट प्रति पौंड वाढले होते. तर २०१८ मध्ये कापसाचा दर सर्वाधिक ९६.४९ सेंट प्रति पौंड पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव ८८ सेंट प्रति पौंडपर्यंत पोहोचले आहेत.
२) यंदा भारतात कापसाची विक्रमी लागवड झाली होती. त्यामुळे भारतात यंदा ४ कोटी गाठी इतके उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. त्यापैकी १ कोटी गाठी या महाराष्ट्रात होतील अशी ही अपेक्षा कापूस बाजारातील तज्ज्ञांना होती. मात्र, अतिवृष्टी, गुलाबी अळी मुळे २० टक्के उत्पादनात मोठी घट होऊन राज्यात ६५ लाख गाठींचे उत्पन्न झाले आहे. तर देशात ही ३० ते ४० टक्के घट झाली. त्यात यंदा निर्यातदेखील वाढली होती. मागणी वाढली मात्र उत्पादन कमी असल्याने भावात वाढ झाली असल्याची माहिती. कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रदीप जैन यांनी दिली.
शेतकऱ्यांना फायदा नाहीच
कापसाचे दर जरी वाढले असले तरी मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाहीय, कारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल फेब्रुवारी महिन्यातच विक्री केला आहे. त्यामुळे या भाव वाढीचा फायदा खासगी व्यापा-यांना अधिक होणार आहे.
पुढच्या हंगामात कापसाला राहील मागणी
पुढील वर्षीदेखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. भारताच्या कापसाची गुणवत्ता आणि भाव हे इतर देशांना परवडणारे आहेत. त्यामुळे पुढील हंगामातदेखील कापसाला मागणी राहणार असून खासगी बाजारात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षादेखील जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे.
कोट
यंदा जेवढी अपेक्षा होती तेवढे उत्पादन झाले नाही, राज्यातदेखील उत्पन्न कमी आले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. मात्र माल कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. पुढील वर्षीही भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
- प्रदीप जैन, कॉटन क्षेत्रातील जाणकार