ओलाव्याचे कारण सांगत कापसाची खरेदी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:16 PM2019-11-13T12:16:52+5:302019-11-13T12:17:21+5:30
गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दरात विकावा लागतोय माल : निर्यात थांबल्याने भावही स्थिर
अजय पाटील
जळगाव : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारात आलेल्या कापसात काही अंशी ओलावा आढळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून एकतर शेतकºयांचा कापूस खरेदी केला जात नाही किंवा केला तर हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी केला जात आहे.
यंदा खान्देशात ७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सप्टेंबरपर्यंत मान्सून चांगला झाल्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकºयांना यंदा ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
पावसामुळे कापूस ओला झाला असून, शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कापूस वेचणी देखील थांबली होती. आता काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कापूस वेचणी सुरु झाली असली तरी मात्र कापसात काही प्रमाणात ओलावा पहायला मिळत आहे.
कमी भावात विक्री करावा लागतोय कापूस
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांना कमी दरात कापूस विक्री करावा लागत आहे. कापसात ओलावा असल्याने एकतर जीनचालक कापूस खरेदी करण्यास नकार देत आहेत.
अन्यथा कमी दराने हा कापूस खरेदी करत आहेत. कमी दरात कापूस विक्री करण्याची शेतकºयांची यंदा मजबुरी आहे.
ओल्या कापसामुळे सीसीआयची पिछेहाट
सीसीआयकडून राज्यात ९० खरेदी केंद्र सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिना अर्धा संपून देखील खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाहीत. सीसीआयच्या अधिकाºयांकडून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जिनींगवर येणाºया मालाची पाहणी केली असता, कापसात ओलावा जास्त असल्याने सीसीआयच्या निकषात कापूस बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत १० टक्क्यांपेक्षा आर्द्रतामुक्त कापूस बाजारात येत नाही तो पर्यंत खरेदी केंद्र सुरु करणार नसल्याची माहिती सीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
मूग, उडीदसाठी शासकीय केंद्रापेक्षा खासगी व्यापाºयांना शेतकºयांची पसंती
जिल्ह्यात मूग व उडीद खरेदीसाठी १५ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रावर केवळ नाममात्र खरेदी सुरु असल्याची माहिती प्रकल्प संचालक परिमल साळुंखे यांनी दिली. खासगी व्यापाºयांकडे हमीभावापेक्षा जास्त भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी शासकीय खरेदीपेक्षा खासगी व्यापाºयांकडेच माल विक्री करत आहेत. दरम्यान, ज्वारी, मका व सोयाबीनसाठीही शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी नावनोंदणी सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली.
निर्यातही थांबली, भावातही वाढ नाही
आंतरराष्टÑीय बाजारात भारत हा मुख्य कापूस निर्यातदार देश आहे. दक्षिण आशियातील व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशियासह, शेजारील चीन व बांग्लादेश या देशांना भारताकडूनच कापसाची निर्यात केली जाते. मात्र, या देशांना सध्या भारताचा कापूस महाग पडत असल्याने या देशांनी भारताकडून होणारी आवक थांबवली आहे. त्याऐवजी ब्राझील व , आॅस्ट्रेलिया, अमेरिकेकडून कापूस आयात केला जात आहे.
आंतरराष्टÑीय बाजारात खंडीचे भाव ३८ हजार इतके सुरु आहेत. त्या तुलनेत भारतात खंडीचे दर ३९ हजार इतके आहेत. कापूस निर्यात करताना निर्यातदार ४२ हजार रुपयांच्या पुढे दर लावतात. मात्र, इतर देशांचे खंडीचे दर ३८ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याने भारताच्या कापसाऐवजी इतर देशाच्या कापसाला प्रमुख निर्यातदार देश प्राधान्य देत आहेत.
भारतात देखील कापसाची आवक कमी आहे. ओलावा असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत नाही किंवा जिनर्स ते खरेदी करत नाही. त्यामुळे कापसाची आवकच नसल्याने खंडीचे दर देखील कमी होत नाही. खंडीचे दर कमी झाले निर्यात वाढेल व कापसाची मागणी वाढल्यास भावातही वाढ होईल. मात्र, सध्या तरी हे चित्र पहायला मिळत नसल्याने भावात अजून डिसेंबर अखेरपर्यंत वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.