आईचे वाचन ऐकून दृष्टी नसतानाही होऊ शकलो सी.ए. - प्रज्ञाचक्षू भूषण तोष्णीवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:50 AM2018-08-13T11:50:51+5:302018-08-13T11:56:32+5:30
सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास कोणत्याही संकटात यशस्वी होण्याचा दिला मंत्र
विजयकुमार सैतवाल
जळगाव : आई पुस्तकांचे वाचन करीत असे अन् मी दररोज अभ्यास करीत असे, त्यामुळेच सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होण्यासह व्यवस्थापनाचे धडे घेऊ शकलो, असे आपल्या यशाचे गुपीत प्रक्षाचक्षू असलेले सी.ए. भूषण नंदकुमार तोष्णीवाल यांनी सांगितले. मोठी संकटे आली तरी मी जिद्द सोडली नाही त्यानुसार प्रत्येकाने संकाटास संधी मानल्यास हमखास यश मिळू शकते, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.
पुणे येथील रहिवासी असलेले व जन्मानंतर २०व्याच दिवशीच दृष्टी गेलेली असताना तशाही परिस्थितीत संपूर्ण शालेय शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होण्यासह आज प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणारे प्रज्ञाचक्षू भूषण तोष्णीवाल हे रविवारी सी.ए. परिषदेसाठी जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न - दृष्टी नसताना एवढे यश कसे मिळविले?
उत्तर - जन्मानंतर २०व्याच दिवशी माझी दृष्टी गेली. त्यामुळे घरात चिंतेचे वातावरण पसरले. मी जसजसा मोठा होत गेलो तसतशा माझ्या आवडही मी जपत गेलो. ब्रेल लिपीच्या सहाय्याने मी शालेय शिक्षण पूर्ण केले व इयत्ता दहावीमध्ये ८७ टक्के गुण मिळविले.
प्रश्न - महाविद्यालयीन शिक्षणात ब्रेल लिपीचा आधार मिळाला का?
उत्तर - नाही. एकतर आता ब्रेल लिपीत पुस्तके नाही मात्र शिक्षण तर घ्यायचे आहे, त्यासाठी माझे आई-वडील माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्या वेळी माझी आई विजया ही मला दररोज अभ्यासक्रमातील पुस्तक वाचून दाखवू लागली. ते ऐकून माझे पाठांतर होऊ लागले व मी परीक्षेत यशस्वी होऊ झालो.
प्रश्न - सी.ए. शाखेकडे कसे वळले?
उत्तर - माझे वडील नंदकुमार तोष्णीवाल हे सी.ए. असून त्यांनी मला सी.ए. होण्याबाबत सुचविले. मात्र सुरुवातीला कठीण वाटत होते. मात्र वडिलांकडून मला प्रेरणा मिळत गेली व मी सी.ए. होऊ शकलो. इतकेच नव्हे मी डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंटदेखील केले असून संगीत क्षेत्रात पदवी मिळविली आहे.
प्रश्न -कार्यालयीन काम कसे करतात?
उत्तर - सध्या मी पुणे येथे एका विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे. तेथे ‘स्क्रीन रिडर’ या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने माझे काम मी संभाळू शकतो.
प्रश्न - कर प्रणाली बदलल्याने तुम्हाला अडचण येते का?
उत्तर - मी ज्या सॉफ्टवेअरच्या सहायाने काम करतो, त्यास नवीन कर प्रणालीची कार्यपद्धती सहाय (सपोर्ट) करीत नाही. त्यामुळे अडचणी येतात. असे असले तरी इतरांचे संभाषण ऐकून मी ते शिकून घेण्याचा प्रयत्न करतो.
संगीत क्षेत्रातही छाप
भूषण तोष्णीवाल यांना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगीताची आवड असून त्याच वयात त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी पाच राग सादर केले हे विशेष. सवई गंधर्व महोत्सवात नाटक सादर करण्यासह विविध दूरचित्रवाणीवरील संगीत कार्यक्रमात अनेक पुरस्कार मिळविले आहे. २०११मध्ये संगीत अलंकार परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मानही तोष्णीवाल यांनी मिळविला आहे.