स्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन व सुविधा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:55+5:302021-04-10T04:15:55+5:30
जळगाव : कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेन अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त ...
जळगाव : कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेन अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.
समुपदेशन व सुविधा केंद्रासाठी दुकाने निरीक्षक जितेंद्र पवार यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, कारखाने येथे काम करीत असलेले स्थलांतरीत, परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मुळगावी जात असल्यास सदर कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या ईमेल वर पाठविण्यात यावी तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मुळगावी परत आलेले, येत असल्यास सदर कामगारांनी देखील त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांका वर संपर्क साधावा. तसेच स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी, प्रश्न असल्यास केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी केले आहे.