कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:39+5:302021-04-20T04:16:39+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार कामगार आयुक्तांनी महाराष्ट्रातील प्रत्येक ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार कामगार आयुक्तांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरित कामगारांकरिता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालय तसेच जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध आस्थापना/ कारखान्यात विशेषत: बांधकाम क्षेत्र, चटई उद्योग व दाल मिलमध्ये ५० हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत. यामध्ये १५ हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय कामगार आहेत. याठिकाणी काम करीत असलेले स्थलांतरित/परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मूळगावी (मूळ राज्यात) जात असल्यास तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मूळगावी परत आलेले/येत असल्यास या कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन केले असून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधता येईल. तसेच स्थलांतरित कामगारांना काही अडचणी/प्रश्न असल्यास कामगार कार्यालयातील जितेंद्र पवार, केंद्र प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.