शहापूर येथील कापूस व्यापाऱ्याकडून नकली नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:49 PM2020-10-31T16:49:00+5:302020-10-31T16:49:23+5:30
गुजराथ येथून येणाऱ्या नकली नोटा कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजारात चालविणाऱ्या शहापूर, ता.जामनेर येथील एका कापूस व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले.
जामनेर, जि.जळगाव : गुजराथ येथून येणाऱ्या नकली नोटा कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजारात चालविणाऱ्या शहापूर, ता.जामनेर येथील एका कापूस व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ हजार ५०० किमतीच्या नकली नोटा तसेच दुचाकी हस्तगत केली आहे. दरम्यान, नकली नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीचे नंदुरबार कनेक्शन असून त्यांच्यामार्फत गुजरात येथून नकली नोटा येत असल्याचा संशय आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गुजरात येथून नकली नोटा आणून त्या कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांमार्फत बाजारात आणल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी पोलीस नाईक विजय शामराव महाजन यांनी शेख फारूक शेख नवाब (वय ४५, रा.शहापूर, ता.जामनेर) याला सकाळी गावाजवळील पुलावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ हजार ५०० च्या नकली नोटा तसेच दुचाकी जप्त केली. फारूक हा ग्रामीण भागात जाऊन कापूस खरेदी करीत असून, त्याला नंदुरबार येथून नकली नोटा मिळाल्याचे सांगण्यात आले.
नकली नोटांची साखळी असून तिची पाळेमुळे ग्रामीण भागात पोहचत असल्याचे यावरून दिसून येते. जामनेर तालुक्यातील काही कापूस विक्रेते परजिल्ह्यात जाऊन कापूस खरेदी करतात. गेल्या वर्षी मापात पाप करणाऱ्या तालुक्यातील कापूस विक्रेत्याची शेतकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली होती.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बहन, सुधाकर लोहारे, पोलीस नाईक सुनील दामोदर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन यांच्या पथकाने कारवाई केली.
दरम्यान, याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती.