चाळीसगावला सात दिवसात १९ हजार क्विंटल कपाशीची मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:08 PM2020-11-26T17:08:52+5:302020-11-26T17:10:15+5:30
भोरस आणि तळेगाव या सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर गत सात दिवसात गुरुवारअखेर १९ हजार क्विंटल कापूस मोजला गेला आहे.
चाळीसगाव : तालुक्यातील भोरस आणि तळेगाव या सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर गत सात दिवसात गुरुवारअखेर १९ हजार क्विंटल कापूस मोजला गेला असून, सद्य:स्थितीत नवीन वाहनांची नोंदणी बंद केली आहे. दोन्ही केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. मंगळवापासून पुन्हा नोंदणी करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने वाहने रांगेत उभी असल्याने मोजणीचा वेग वाढवावा. आमची गैरसोय टाळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चाळीसगाव तालुक्यात यावर्षी कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. १९ पासून तळेगाव व भोरस येथे सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू झाली. गेल्यावर्षी एकच खरेदी केंद्र होते. गेल्या सहा दिवसात दोन्ही केंद्रांवर ५०० वाहने व २०० बैलगाड्यांमधून आलेला १५ हजार क्विंटल कापूस मोजला गेला. यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. वाहने रांगेत उभी असल्याने दरदिवशी ५०० रुपयांचा भूर्दंड मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे मोजणी वेगाने करावी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
२७३ वाहने अजूनही रांगेत
गत सात दिवसात १९ हजार क्विंटल कपाशीची मोजणी झाली असली तरी, भोरस आणि तळेगाव येथील खरेदी केंद्रांवर वाहनांची रांग कमी झाली नाही.
भोरस येथील २०० तर तळेगाव केंद्रावर उभ्या असणाऱ्या ७३ अशा एकूण नोंदणी झालेल्या २७३ वाहनांमधील कापूस मोजणे अजून बाकी आहे. या वाहनांमधील मोजणी ३० पर्यंत होईल. रविवारी आणि सोमवारी गुरुनानक जयंती असल्याने खरेदी केंद्रे बंद राहणार आहेत. यामुळे सद्य:स्थितीत नवीन वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली आहे.
नवीन नोंदणी १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठीच निर्णय घेण्यात आल्याची माहिती खरेदी केंद्रातील व्यवस्थापकांनी दिली.
२७३ वाहनांमधील कपाशीची अजूनही मोजणी बाकी आहे. शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रांवर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतीक्षेतील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच नवीन नोंदणी ३० पर्यंत बंद ठेवली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून पुन्हा नोंदणी सुरू होईल.
- सतीश पाटील, प्र. सचिव, कृउबा समिती, चाळीसगाव