जळगावात एकाच वेळी ८४ टेबलवर होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:56 AM2019-05-22T11:56:56+5:302019-05-22T11:57:22+5:30
जळगाव मतदार संघाची २४ तर रावेर मतदार संघाची २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी
जळगाव : लोकसभा निवडणुकीतील जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २४ फेºयांमध्ये तर रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ फेºयांमध्ये करण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होऊन त्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५६.१२ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्व निवडणूक यंत्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षा कोठडीत सिलबंद करून ठेवण्यात आले असून दोन्ही मतदार संघाची २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.
प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र कोठडीतून काढणार
२३ रोजी मतमोडणीसाठी सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येणार असून मतमोजणीसाठी सहा कक्ष तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो आॅफिसर, सुविधा कर्मचारी, टॅबुलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदार संघासाठी एकूण १३२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, रावेर मतदार संघाचे निरिक्षक छोटेलाल प्यासी, जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ४०२४ टपाली तर ३८९९ सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी २४८५ टपाली तर ११९० सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे.
टपाली मतदानाची मोजणी १० आणि ईटीबीपीएस मतदानाची मोजणी १५ टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.