मुंबईत लागलेल्या आगीत चोपड्याच्या दाम्पत्याचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 09:54 PM2021-03-26T21:54:33+5:302021-03-26T21:56:09+5:30
मुंबईत लागलेल्या आगीत चोपडा तालुक्यातील वेले येथील दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला.
चोपडा : मुंबईतील भांडुप (पश्चिम) येथे कोविड हॉस्पिटलला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत वेले, ता.चोपडा येथील दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. आबाजी नारायण पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुनंदाबाई आबाजी पाटील (वय ६०) अशी त्यांची नावे आहेत.
मुंबई येथे जेल पोलीस म्हणून सेवेत असलेले स्वप्नील आबाजी पाटील यांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे त्यांनी उपचारासाठी वडील आबाजी नारायण पाटील आणि आई सुनंदाबाई आबाजी पाटील यांना मुंबईत भांडुप (पश्चिम)मध्ये सनराइज् कोविड हॉस्पिटलमध्ये पाच दिवसांपूर्वी नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोविड हॉस्पिटलला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. त्यात या दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कार मुंबईत दुपारी चारला करण्यात आले. त्यांच्या पश्चात एकमेव स्वप्नील पाटील व मुलगी आहे. आबाजी पाटील हे कापूस जिनिंगमध्ये काम करीत होते.