दाम्पत्याला मारहाण करुन लुटले अन् तेथेच आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:54 AM2019-08-23T11:54:25+5:302019-08-23T11:56:17+5:30
रामदेववाडी शिवारात थरार : जखमींनी लुटारुंना ओळखले; दोघांना घेतले ताब्यात
जळगाव / शिरसोली : जळगाव येथून उत्राण, ता.एरंडोल येथे घरी जाणाऱ्या दिलीप काशिनाथ पाटील (३०) व नेहा दिलीप पाटील (२६) या दाम्पत्याला चौघांनी मारहाण करुन नेहा यांच्या अंगावरील दागिने लुटल्याची थरारक घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी साडे तीन वाजता शिरसोली-रामदेववाडी रस्त्यावर टेकडीजवळ घडली. दरम्यान, या घटनेनंतर लगेच अर्ध्याच तासाच घटनास्थळापासून काही अंतरावर बळीराम आखाडू भील (१९, रा. शिरसोली) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे लुटमार व मृतदेह या दोन्ही घटनांचा एकमेकाशी संबंध आहे का?, असेल तर काय? याची चौकशी पोलीस करीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्राण येथील दिलीप पाटील हा तरुण पत्नी नेहा हिला जळगाव येथे घेण्यासाठी आला होता. दुपारी ते दोघं दुचाकीने घरी जात असताना रामदेववाडी शिवारात दिलीप लघुशंकेसाठी थांबला. त्याचवेळी जंगलातून आलेल्या दोघांनी पत्नी नेहा हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले आणि तिला मारहाण केली. हा प्रकार पाहून धावत आलेल्या दिलीप याला दोघांनी ओढून जंगलात नेले. तेथे आधीच दोन जण थांबलेले होते. तेथे दिलीप याला बेदम मारहाण झाली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला.
मृत पाळधीच्या ढाब्यावर कामाला
या घटनेतील मृत बळीराम हा पाळधी येथील ढाब्यावर कामाला होता. वावडदा येथील डॉक्टर शेतातून येत असताना रस्त्यात अनोळखी तरुण मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृृष्ण पाटील यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटलासोबत काही गावकरी आले असता त्यात बळीराम याचा चुलत भाऊ होता, त्यानेच त्याला ओळखले. नंतर पोलिसांना घटना कळविली.
लुटीच्या घटनेनंतर अर्ध्या तासाने आढळला हाकेच्या अंतरावर मृतदेह
ज्या ठिकाणी लुटीची घटना घडली, त्यापासून हाकेच्या अंतरावर बळीराम आखाडू भील या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. बळीराम हा पाळधी येथील ढाब्यावर कामाला आहे. रक्षाबंधनानिमित्त वरणगाव येथील बहीण सुशिला राहूल भील ही बुधवारी घरी आली होती. तिने रात्री बळीरामला राखी बांधली, नंतर सकाळी ती वरणगाव येथे रवाना झाली तर बळीराम देखील ११ वाजता कामावर जातो सांगून घराबाहेर पडला. रामदेववाडी शिवारात काहीही संबंध नसताना त्याचा मृतदेह या भागात कसा आला? असा प्रश्न निर्माण झाला. याची पोलीस चौकशी करीत आहेत.
पत्नीची आरडाओरड अन् लुटारुंचे पलायन
लुटमार व पती रक्ताच्या थारोळ्यात पाहून पत्नी नेहा रस्त्यावर आरडाओरड करायला लागली. तेव्हा दुचाकीने औरंगाबाद येथे जात असलेल्या जितेंद्र जायस्वाल या तरुणाने थांबून महिलेकडे धाव घेतली. तोपर्यंत संशयित लुटारु पसार झाले होते. नेहा यांच्याकडून लुटमारीची घटना ऐकून त्यांनी रस्त्यावरील लोकांना थांबविले. जखमी दाम्पत्याला तेथून म्हसावद येथे दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर लोकांनी लुटारुंचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.
दोघांची उशिरापर्यंत चौकशी
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. दरम्यान, जखमी दिलीप व त्याची पत्नी नेहा यांनी ताब्यात घेतलेल्याना ओळखले. रात्री उशिरापर्यंत दोघांची चौकशी सुरु होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.