दाम्पत्याला भरधाव कारने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 01:04 PM2019-12-09T13:04:12+5:302019-12-09T13:04:23+5:30
जळगाव : शहराकडून एरंडोलकडे जात असलेल्या दुचाकीला धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने शंकर रामदास गुंजाळ (५०) व ...
जळगाव : शहराकडून एरंडोलकडे जात असलेल्या दुचाकीला धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने शंकर रामदास गुंजाळ (५०) व त्यांची पत्नी वैशाली शंकर गुंजाळ (४५ रा. मुसळी, ता. धरणगाव) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता महामार्गावरील एकलग्न गावापासून काही अंतरावर पेट्रोल पंपाजवळ झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर व वैशाली गुंजाळ हे पती-पत्नी रविवारी आपले काम आटोपून पाळधीकडून दुचाकीने (एम.एच.१९ ए. एल.५७४०) घराकडे जात असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या कारने (एम.एच.०५ डीएच४१८५) एकलग्न गावाजवळ दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गुंजाळ दाम्पत्य दुचाकीवरुन फेकले गेले.
दोघांच्या हातापायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. घटनास्थळी पाळधी पोलिसांनी धाव घेतली. अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. कार चालकाचे नाव उशिरापर्यंत उपलब्ध झाले नसल्याची माहिती पाळधी पोलिसांनी दिली.
सलग दुसºया दिवशी अपघात, चार जखमी
महामार्गावर सलग दोन दिवसापासून अपघात होत आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाळधी बायपासवर राजाराम भास्कर भालेराव व त्यांचा मुलगा या पिता-पूत्राच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील आठवड्यातही या महामार्गावर जैन कंपनीजवळ अपघात झाला होता.
_- वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटनांमध्ये आणखी चार जण जखमी झाले आहेत. चौघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रफुल्ल नागराज (२८ खेडी), गफूर शेख (२५, ख्वॉजानगर), कल्पेश मोरे,(२८,जळगाव) व गायश्री पाटील (११, नशिराबाद) यांचा समावेश आहे.