कासोद्यात धाडशी घरफोडी फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 09:01 PM2020-01-08T21:01:44+5:302020-01-08T21:02:38+5:30
बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे.
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे. सराफाचे होऊ घातलेले मोठे नुकसान टळले आहे.
येथे रविराज फोटो स्टुडिओच्या शेजारी केशव सोनार यांचे सराफा दुकान आहे. दि.७ रोजी कासोदा बाजार होता. दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वासुदेव सोनार यांनी दुकान बंद केले व घरी गेले. या दुकानाशेजारी वास्तव्य कमी व दुकाने जास्त असल्याने रात्री हा परिसर सामसूम असतो. शेजारी जिल्हा बँकेची शाखादेखील आहे. पण कर्मचारी कामकाज आटोपून घरी निघून जातात. या परिसराची आधी रेकी करण्यात आली असावी व नेमका हा चौक चोरट्यांनी निवडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दि.७ च्या रात्री आठ होमगार्ड गावात बंदोबस्ताला होते. दोन पोलीस गाडीसोबत असे १० होमगार्ड कर्तव्य बजावत होते. पहाटे चारला कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड बिर्ला चौकात एकत्र आले. दररोजसारखा एकत्रित फोटो काढून खात्याच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला. पहाटे साडेचार-पाचला लोक जागे झाल्यावर घरी जाण्याच्या तयारीत असताना शाळेच्या सहलीची बस गावात आली. त्या दरम्यान भडगावकडून एक चारचाकी गाडी गावात येताना होमगार्डस्ना दिसली. पण ती चारचाकी गाडी विद्यार्थ्यांची गर्दी पाहून थबकली व परत जाताना दिसली. ही गाडी परत का गेली या शंकेमुळे गावात कर्तव्यावर असलेले सर्व होमगार्ड गावातील प्रमुख रस्त्यावर धावले. ही गाडी केशव सोनार या सराफाच्या दुकानाजवळ थांबली. तिच्यातून दोन दरोडेखोर उतरले. त्यांच्या जवळच्या मोठ्या कटरने एका शटरची लॉकपट्टी (कान) कापले. दुसºया बाजूची लॉकपट्टी कापत असताना बाळू जाधव हा एकटा होमगार्ड या रस्त्याने धावला. मोटारसायकलचा लाईट चमकताना दिसताच हे दरोडेखोर पटापट गाडीत बसले. गाडी सुरुच होती. ती सुसाट वेगाने जगदंबा माता मंदिराच्या दिशेने पळाली. हा होमगार्ड मोटारसायकलवरच या कारच्या दिशेने जोरजोरात चोर-चोर आरोळ्या मारत धावला. पुढे मन्यार मशीद चौकात आनंद विसपुते व इस्त्याक अली यांनी ही गाडी अडवायचा प्रयत्न केला. मात्र हे दरोडेखोर भडगावच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांनी घेतली बैठक
दरम्यान, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गावातील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावून याबाबत नागरिकांची मत जाणून घेऊन मौलिक सूचना केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामी समर्थ मंदिर, संजय येवले, सुनील झंवर, किशोर गुजराती, पिरन शेख, ईश्वर पाटील, जगदंब पटेल, मनोज पिंगळे या व्यापाºयांकडे चोरी झाली आहे. पांडेनगर भागात नुकतीच गाय चोरीला गेली आहे. पण या चोरट्यांचा शोध न लागल्याने गावकºयांत या धाडशी चोरीमुळे दहशत पसरली आहे.
सपोनि रवींद्र जाधव व सहकाºयांनी बुधवारी सराफाच्या दुकानात भेट देऊन सीसीटीव्ही लावणे व इतर सूचना केल्या आहेत. पण श्वानपथक किंवा नाकेबंदी किंवा दरवाजावरील ठसे वगैरे न घेतल्याने या प्रकाराचे गांभीर्य पोलिसांना आहे की नाही याबाबत जनतेतून चर्चा होत आहेत.
कासोद्यातून भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल या दिशेने जाणारे मार्ग आहेत. या गाडीचा नंबर ८२९३ आहे. या सर्व मार्गाने त्वरित नाकाबंदी केली गेली असती तर कदाचित हे दरोडेखोर सापडले असते, अशी जाणकारात चर्चा होत आहे.
दिवसभर व्यवसाय आटोपल्यावर पाच फुटी लॉकर (तिजोरी)मध्ये दागिने ठेवतो. शटरला दोन मोठे कुलूप, सेंटरलॉक आहे. नंतर चॅनल गेटदेखील आहे. एवढी काळजी आम्ही घेतो. पोलिसांची गस्त असते. तरीदेखील दरोडेखोर हा प्रयत्न करतात. याचे आश्चर्य आहे.
-केशव सोनार, कासोदा