न्यायालयाच्या आदेशाने १६ जणांवर एक वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:06 PM2021-03-10T13:06:11+5:302021-03-10T13:07:39+5:30
डांगर येथील १० वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वर्षभरानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : डांगर येथील १० वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता त्याचा अंधश्रद्धेने नरबळी देण्यात आल्याचा आरोप करत त्याच्या पालकांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशाने 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतत आजारी असलेला आपला मुलगा बरा व्हावा म्हणून गावातीलच १० वर्षांच्या बालकाला शेतात जेवणाला बोलावून त्याला धरणात बुडवत नरबळी दिल्याचा आरोप डांगर बु. येथील नागरिकांनी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने एका वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे.
डांगर बु. येथील इंदल हिरामण चव्हाण यांचा मुलगा झिंग्या हा नेहमी आजार राहत होता. त्यामुळे मुलगा बरा व्हावा म्हणून इंदल याने जादू जादूटोण्यावर विश्वास ठेवून शेतात चावदस निमित्त ७ एप्रिल २०२० रोजी डाळ बट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. या जेवणासाठी त्यांनी गावातील सुभाष बसराज राठोड (वय 39) यांचा मुलगा सुदर्शन सुभाष राठोड (१०) याला निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्याला बोलावून घेण्यासाठी झिंग्याला पाठवले होते. तो सुदर्शन याला घरून बोलावून घेऊन गेला.
त्यानंतर सुदर्शन याच्या कपाळावर टिळा लावून गळ्यात मिरची, लिंबू घालून सुदर्शन रोहिदास चव्हाण यांच्या शेताजवळील धरणात घेऊन गेले. त्याला धरणात बुडवून मारले. असा आरोप वडील सुभाष राठोड यांनी केला होता याप्रकरणी न्यायालयाने आरोपी रोहिदास हिरामण चव्हाण, मनीराम हिरामण चव्हाण, इंदल हिरामण चव्हाण, योगेश मनीराम चव्हाण, रामसिंग नंदा चव्हाण, दादू रोहिदास चव्हाण, निलेश रोहिदास चव्हाण, सोनी रोहिदास चव्हाण, निकिता इंदल चव्हाण, चंद्रकला मनीराम चव्हाण, तुळसाबाई रोहिदास चव्हाण, भारती इंदल चव्हाण, ताई रामसिंग चव्हाण, शंकर रामसिंग चव्हाण, नवसाबाई हिरामन चव्हाण (सर्व रा. डांगरी) आणि ज्ञानेश्वर चव्हाण (रा. रणाईचे) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंभिर शिंदे करीत आहेत. गुन्ह्यांचा सखोल तपास केला जात असल्याने अद्याप कोणालाही अटक नाही.