गेडाम यांच्या गैरहजेरीवर न्यायालयाची नाराजी
By admin | Published: January 31, 2016 12:32 AM2016-01-31T00:32:33+5:302016-01-31T00:32:33+5:30
घरकूल प्रकरण : वॉरंट काढण्याची मागणी
धुळे : तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल प्रकरणाचे कामकाज शनिवारी मूळ फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकले नाही. मात्र डॉ.गेडाम यांनी आपल्या अनुपस्थितीबद्दल कोणताही अर्ज किंवा पूर्वकल्पना न्यायालयाला दिलेली नसल्याने साक्षीदार व सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीविषयी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचे कामकाज आता 1 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. घरकूल प्रकरणात सध्या डॉ.प्रवीण गेडाम यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवण्याचे काम सुरू आहे. परंतु शनिवारी डॉ. गेडाम व सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण हे उपस्थित नव्हते. वॉरंट काढण्याच्या मागणीला सहमती दर्शवत 1 फेब्रुवारीला जर अॅड.प्रवीण चव्हाण व डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित राहिले नाहीत; तर त्यांना वॉरंट बजावण्यात येईल, असे न्या.कदम यांनी स्पष्ट केले. वॉरंट काढा! हा खटला लवकर निकाली निघावा, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आठवडय़ातून किमान तीन दिवस कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सरकारी वकील व साक्षीदार कामकाजाला उपस्थित राहत नाही, अनुपस्थितीबाबत ते कोणतीही पूर्वकल्पना देत नाहीत म्हणून संपूर्ण यंत्रणा नाहक वेठीस धरली जाते. हा प्रकार गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांच्या नावे वॉरंट काढावे, अशी मागणी संशयितांच्या वकिलांनी केली.