अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास, न्यायालयाने ठोठावली शिक्षा
By सुनील पाटील | Published: August 25, 2022 05:25 PM2022-08-25T17:25:14+5:302022-08-25T17:27:01+5:30
शाळकरी अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास ठोठावला आहे.
जळगाव : शाळकरी अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करुन तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या विजय प्रकाश घोडेस्वार याला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीचे वय 19 वर्षे असून तो भडगाव येथील रहिवासी आहे. अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
दरम्यान, पीडित बालिका पाचोरा तालुक्यात मामाकडे शिक्षणासाठी आलेली होती अशी माहिती समोर आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना विजय घोडेस्वार हा तिचा दुचाकीवरुन शाळेपर्यंत पाठलाग करीत होता. मला तुझ्याशी बोलायचे आहे, प्रेमाच्या गोष्टी करायच्या आहेत, मला किती दिवस फिरवशील, मी दिलेल्या चिठ्ठीला तू लाथ मारली असे एक ना अनेक गोष्टी बोलून तो पीडितेचा छळ करत होता. २१ जुलै २०१७ रोजी विजय याने शाळेजवळच हात पकडून अश्लिल वर्तन केले. घाबरलेल्या पीडितेने घरी जाऊन हा सर्व प्रकार मामाला सांगितला. मामाने घटनास्थळी येऊन चौकशी केली असता विजय घोडेस्वार हा तिथेच आढळून आला. याप्रकरणी मामाच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसात विनयभंग (३५४ अ,ड) व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
नऊ साक्षीदारांची तपासणी
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला. पोक्सोच्या विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन ९ साक्षीदारांची तपासणी केली. त्यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपीला दोषी धरुन विनयभंगाच्या तीन कलमाखाली प्रत्येकी एक तर पोक्सोच्या कलमातंर्गत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सोबत आठ हजाराचा दंडही ठोठावण्यात आला. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी यात विशेष सहकार्य केले.