कोविड केअर सेंटर प्रथमच पूर्णत: रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:06+5:302021-07-19T04:13:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११३ वर आली असून रुग्णसंख्या घटत असल्याने दोन्ही लाटांमध्ये प्रथमच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ११३ वर आली असून रुग्णसंख्या घटत असल्याने दोन्ही लाटांमध्ये प्रथमच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर प्रथमच रिकामे झाले आहेत. आता या सेंटरचे पूर्ण ९६९७ बेड रिक्त आहेत. विशेष बाब म्हणजे गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे.
जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून बाधितांच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. एक टक्क्याच्या खालीच पॉझिटिव्हिटी असून रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण सध्याच्या घडीला उपचार घेत नाहीय. ही दिलासादायक बाब असून सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाभरात जामनेरात २, तर चाळीसगावात ३ बाधित आढळून आले आहेत. मुक्ताईनगर, भडगाव, एरंडोल या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्णावर उपचार सुरू आहे. चोपडा व बोदवड तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली आहे. भुसावळ तालुक्यातही सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे.
एका दिवशी वाढ दुसऱ्या दिवशी भोपळा
शहरात रविवारी पुन्हा एकदा कोरोनाला भोपळा मिळाला असून ग्रामीण भागातही रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही २८ वर आली आहे. दरम्यान, शनिवारी शहरातच ८ रुग्ण आढळल्याने काहीशी चिंता वाढली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी हीच संख्या पुन्हा शून्यावर गेली.
अशी आहे स्थिती
कोविड केअर सेंटर : ००
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर : २७
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल : १५
ऑक्सिजनवरील रुग्ण : २२
आयसीयूतील रुग्ण : ५