वाचविण्यापेक्षा जीव घेणारे कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:48 AM2020-06-11T11:48:20+5:302020-06-11T11:48:30+5:30

कोरोना रुग्णालयाची निर्माण होतेय नवीन ओळख : महिला बेपत्ता असताना आठवडाभर दुर्लक्ष, यंत्रणेवर अनेक प्रश्न

Covid hospital that takes lives rather than save | वाचविण्यापेक्षा जीव घेणारे कोविड रुग्णालय

वाचविण्यापेक्षा जीव घेणारे कोविड रुग्णालय

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेपत्ता महिलेचा नऊ दिवसांनी स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणेच्या कारभारावर असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत़ जळगावचा कोरोनाच्या बाबतीत देशाच्या चौपट मृत्यूदर असणे हा प्रकार म्हणजे येथे उपचार होण्यापेक्षा मृत्यू होण्यावरच अधिक भर आहे का, असा प्रश्न निर्माण होत असतानाच आता एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू होऊन ती रुग्णालयातच पडून राहणे म्हणजे जीव वाचविण्यापेक्षा जीव घेणारे रुग्णालय म्हणूनच आता कोरोना रुग्णालयाची ओळख होत असल्याची टीका होऊ लागली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भोंगळ कारभाराचे वाभाडे काढणारी अनेक प्रकरणे गेल्या महिनाभरात समोर आली आहे़ या घटनेनंतर कारवाईची मागणीही जोर धरत आहे़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांच्या सोबत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला बेपत्ता झाल्यानंतर आम्ही तपास केला व तात्काळ सायंकाळी पोलिसांना कळविले होते’ असे उत्तर अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी दिले होते़ मग ही वृद्धा पुन्हा रुग्णालयातच कशी सापडली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्य मंत्री बैठक घेत असताना मृतदेह स्वच्छतागृहात
जळगावातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासह मृत्यूदर वाढण्याच्या प्रकाराचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्या कोरोना रुग्णालयात बैठक घेत होते, त्याच कोरोना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात कोरोना बाधित महिला मृतावस्थेत पडून होती, असाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही वृद्धा २ जून दुपारपासून बेपत्ता असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून ३ जूनला दुपारी आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतली होती़

जिल्हाधिकारी, डीन यांचे अपयश'
कोरोनासारखी गंभीर परिस्थिती हाताळताना जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अपयश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय स्थलांतराचा विषय असो की कोविड रुग्णालय घोषीत करण्याचा विषय यात जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने निर्णय बदलविले. वारंवार निर्णय बदलण्यामागे जिल्हाधिकाऱ्यांची नेमका हेतू काय? असाही सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, कोरानाबाधित महिला बेपत्ता झालेली आहे, याची माहिती जिल्हाधिकाºयांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही देण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नातवाची शंका ठरली खरी
आजीची प्रकृती अत्यंत गंभीर होती, म्हणूनच आजीला भुसावळ येथून १ जून रोजी जळगाव पाठविण्यात आले होते़ प्रकृती गंभीर असल्याने आजी बाहेर जावू शकत नव्हत्या, आतच काहीतरी झाल्याची शंका या नातवाने वारंवार व्यक्त केली होती़ मात्र, त्या दृष्टीने तपासच होत नसल्याचेही म्हटले होते़ अखेर या नातवाची शंका खरी ठरली व आठवडाभरानंतर आजीचा मृतदेह सापडल्याचा पोलिसांचा फोन गेला व अनेक दिवसांपासून चिंतातूर असलेल्या मनात धसका बसला व ही चिंता थांबून दु:खात परावर्तीत झाली़

खासदारांच्या पाहणीतही प्रकार समोर नाही
खासदार उन्मेष पाटील यांनी रविवारी कोविड रुग्णालयात संपूर्ण पाहणी केली होती़ बाधित रुग्णांशीही संवाद साधला होता़ त्यांच्यासोबत संपूर्ण यंत्रणाही फिरली होती़ तासाभरापेक्षा अधिक वेळ हा पाहणी दौरा होता, असे असतांनाही या महिलेच्या मृतदेहाबाबत कसलीच माहिती समोर आली नव्हती़

आरोग्य मंत्री बैठक घेत असताना मृतदेह स्वच्छतागृहात
जळगावातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासह मृत्यूदर वाढण्याच्या प्रकाराचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्या कोरोना रुग्णालयात बैठक घेत होते, त्याच कोरोना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात कोरोना बाधित महिला मृतावस्थेत पडून होती, असाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही वृद्धा २ जून दुपारपासून बेपत्ता असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून ३ जूनला दुपारी आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतली होती़

कर्मचारी आंदोलन करतात, साफसफाई होते की नाही?
कोविड रुग्णालयात कार्यरत कंत्राटी स्वच्छता कर्मचाºयांनी काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते़ अत्यंत कमी पगारात काम करावे लागत असल्याची खंत या कर्मचाºयांनी व्यक्त केली होती़ दरम्यान, या कर्मचाºयांकडे स्वच्छतेव्यतिरिक्त अन्य वेगळी भरपूर कामे दिले गेल्याचे त्यावेळीही समोर आले होते़ कोणी नोंदणीसाठी, कोणी वाहन खाली करायला, कोणी टपालाची ने आण करण्यासाठी त्यामुळे नेमक्या स्वच्छतेचा विषय व हा गंभीर मुद्दा समोर आला आहे़ नियमित स्वच्छता होत असती तर हा गंभीर प्रकार लवकर लक्षात आला असता, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत विचार होत नसल्याने रुग्णालयात साफसफाईचेदेखील काम होते की नाही, या बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

प्रशासनाला लोकमतचे प्रश्न
१) गेल्या आठ दिवसापासून ही वृध्द महिला स्वच्छतागृहात होती. या काळात
एकही रुग्ण किंवा स्टाफ यापैकी कोणीही स्वच्छतागृहात गेले नाही का?
२) सफाई कर्मचारीही तेथे स्वच्छतेसाठी गेला नाही का?
३) आतून कडी बंद असल्याचे समजल्यानंतरही हा प्रकार वरिष्ठांना कोणी का
सांगितला नाही?
४) आतून कडी बंद असल्याचे केव्हा उघड झाले?
५) या वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का?
६) ज्या वॉर्डातून बेपत्ता झाल्या तेथील स्टाफचे रुग्णांकडे लक्ष नाही का?
७) वॉर्डात स्वच्छता होते की नाही याकडे मुकादमाचे लक्ष नाही का?

या घटनेबाबत तातडीने आपण उपमुख्यंत्र्यांशी बोललो आहोत़ मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहोत़ जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल़ महिला बेपत्ता झाली त्या दिवसापासून स्वच्छतागृहाकडे कोणी गेलेच नाही का? पोलीस का आले नाही, या सर्व बाबी आहेच. त्याचाही तपास केला जाईल.
- गुलाबराव पाटील,
पालकमंत्री

कोविड रूग्णालयात घडलेला हा प्रकार वेदनादायक आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सहभागी झालो असताना या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिली. जिल्ह्यात अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
- गिरीश महाजन,
आमदार

दोष असल्यानेच एवढा मोठा गोंधळ झाला़ कुणी हरवले आहे आणि ते न पाहणे ही मोठी चूक आहे़ घरातील कोणतीही वस्तू हरवली तर ती आपण आधी पूर्ण घरात शोधतो नंतर बाहेर शोधतो़ ही चूक आहेच, या चुकीबद्दला ज्याला शिक्षा द्यायची त्याबद्दलचा अहवाल तातडीने आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत़ शासनस्तरावर कारवाई होईल
-डॉ़ अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी

आजीच्या मृत्यूला कोविड रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालून दोषी असलेल्या संबंधित व्यक्तीविरुध्द तातडीने कारवाई करावी. २ जूनपासून आजी बेपत्ता झाली होती. १० रोजी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आजी मृतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी मला कळविले. रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
-हर्षल नेहते,
मृताचे नातू

Web Title: Covid hospital that takes lives rather than save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.