विकास होण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:30+5:302021-07-12T04:11:30+5:30
कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : गट ग्रामपंचायत असल्यामुळे लालगोटा येथे अनेक वर्षांपासून विविध विकास कामे खोळंबली आहेत. शासकीय योजनांचा ...
कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : गट ग्रामपंचायत असल्यामुळे लालगोटा येथे अनेक वर्षांपासून विविध विकास कामे खोळंबली आहेत. शासकीय योजनांचा लाभ सुद्धा योग्य प्रमाणात मिळत नसल्याने गावाचा विकास थांबला आहे. विकासाचा प्रवाह पुन्हा आदिवासी समाजापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशी मागणी लालगोटा येथील आदिवासी बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
मुक्ताईनगर मतदार संघातील विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि तत्काळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत सुरू आहे. यावेळी ही मागणी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत आमदार पाटील यांनी मदापुरी, जोंधनखेडा, राजुरा पावरी वाडा, धुळे पाडा, लालगोटा, हलखेडा आदी आदिवासी गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लालगोटा भेटीत तेथील फासेपारधी आदिवासी बांधवांनीसुद्धा गावातील समस्यांचा पाढा वाचला. लालगोटा व हलखेडा ही दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांमधील अंतर सुमारे साडेचार ते पाच किमी आहे. ग्रामपंचायत कार्यालय हलखेडा येथे असून दाखले, उतारे घेण्यासाठी लालगोट्याच्या नागरिकांची पायपीट होते. अपंग आणि वृद्धांचे तर फारच हाल होतात.
विशाल पवार, केवळदास पवार, जोगिंदर भोसले, बल्लू भोसले, भगवान भोसले, केनसिंग भोसले, शरबतलाल पवार, इजानन पवार, मोंटूस पवार, शेरसिंग भोसले, रंजित पवार, सोद्यासिंग पवार, वडल चव्हाण, बबूआ भोसले, फुटास भोसले, डॉन पवार, दुर्योधन पवार, अक्काबाई भोसले, फायलनबाई पवार, पठूडाबाई भोसले, पांडा भोसले, रामद्याबाई पवार, लस्कामाम भोसले, शर्मिला भोसले, किशोर चव्हाण, तिगडी भोसले, नेकुल चव्हाण, आचेलाल भोसले, शिकर पवार, आदेश पवार यांच्यासह अनेक आदिवासींनी आमदार पाटील यांच्याकडे स्वतंत्र ग्राम पंचायतची मागणी केली
गावात आहेत अनेक समस्या
विकास कामांचा निधी या दोन्ही गावांमध्ये विभाजित होतो त्यामुळे लालगोटा गावावर नेहमीच अन्याय होतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रस्ते, गटारी नाहीत. दिवाबत्तीची समस्या आहे. लालगोट्यात आजही शौचालये खूप कमी आहेत. घरकुल लाभापासून अनेक कुटुंब वंचित आहेत. शिक्षणाची वाटसुद्धा बिकट आहे.