संशोधनासाठी कृती आराखडा तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 09:50 PM2020-02-03T21:50:43+5:302020-02-03T21:50:58+5:30
पक्षीमित्र संमेलनातील सूर : उत्तर महाराष्ट्रात जैवविविधता आणि वन्यजीवांच्या संशोधनासाठी व्यासपीठ उभारणार
जळगाव : उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात वन्यजीव आणि आणि निसर्ग संवर्धनाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनतीने व्यापक कार्य करीत आहेत. परंतु त्यांच्या कार्याला संशोधनाची जोड नसल्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात नाही, अशी खंत उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष अनिल माळी यांनी व्यक्त केली. जैवविविधता आणि वन्यजीवांच्या संशोधनासाठी दोन वर्षाचा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
ते पक्षीमित्र संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जैवविविधतेच्या विविध घटकांवर आधारित प्रबंध, निबंध, लघुशोध प्रबंध, लिहून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये मासिकांमध्ये, पक्षिकामध्ये प्रकाशित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनात आज संशोधन मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सुधाकर कुºहाडे (अहमदनगर) यांच्याकडे संशोधन व्यासपीठाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लहान-मोठ्या शोधकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संघटनेतर्फे निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले. हा निधी उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व संघटनांकडून भरला जाणार आहे.
महाराष्ट्र क्षेत्रात पक्षी संवर्धन याबरोबरच वन्यजीवन जैव विविधता यांचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी सर्वंकष विचार करणारी संघटना स्थापन करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. या अनुषंगाने अस्थायी समितीची घोषणाही करण्यात आली आहे.
वसुंधरा महोत्सवाची सांगता
जळगाव : विभागीय पक्षीमित्र संमेलनात रविवारी सकाळी सात वाजता गांधी तीर्थवरील जलाशयावर जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर सुधाकर कुºहाडे आणि अनिल माळी यांनी मार्गदर्शन केले. या परिसरात निसर्ग भ्रमण आणि पक्षी निरीक्षणही करण्यात आले, या पार्श्वभूमीवर सुहास जोशी (मुंबई) यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी देशातील पाणथळ क्षेत्र संकटात असल्याचे सांगितले.
याविषयी अनेक आंतरराष्ट्रीय दाखले देऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वेटलँड इंटरनॅशनल साउथ एशियाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे भारतात सर्वाधिक वेटलँडचा नाश होत असून, पाणथळीचे संवर्धन हा शासन-प्रशासन, समाज अशा सर्वांच्याच अनास्थेचा विषय आहे. जोशी यांनी खान्देशातील अनेक उदाहरणे दिली. यातील विशेषत: नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अलिकडे आपल्या जिल्ह्यात पाणथळ क्षेत्र उपलब्ध नाही, असे विधान केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, पाणथळीच्या सर्वेक्षणा विषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये ७३५ पाणथळ क्षेत्रे आहेत आणि त्यातील ३१ क्षेत्रे आरक्षित करण्यात आली आहे, परंतु तरीही एका जबाबदार प्रशासकीय अधिकाºयाने असे विधान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
याव्यतिरिक्त संमेलनात अनेक पक्षीमित्रांनी सादरीकरण केले, यामध्ये इम्रान तडवी, डॉ. भागवत (धुळे), उदय चौधरी (तां दळवाडी), राहुल सोनवणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आगामी संमेलन नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या संमेलनाचे संयोजन समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेच्यावतीने करण्यात आले होते आणि संयोजन सहभाग म्हणून वन्यजीव संरक्षण संस्था, न्यू काँझर्वर, चातक नेचर कॉन्झर्वेशन संस्था, उपज, गरुड झेप, अग्निपंख, आणि उडान, आॅर्किड नेचर फाऊंडेशन या संस्थांनी भूमिका पार पाडली.