द क्रिएशन आॅफ अॅडम : जीवनाची तर्जनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 04:14 PM2018-02-11T16:14:13+5:302018-02-11T16:14:55+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंगसंगती’ या सदरात लिहीत आहेत अॅड.सुशील अत्रे
जगाच्या पाठीवरल्या प्रत्येक संस्कृतीत, मानवाच्या निर्मितीची आपापली अशी वेगळी कथा आहे. (आणि या बाबतीत कोणालाच डार्विन मानवत नाही). ज्या चित्राबद्दल आपण बोलतोय त्यात बायबलमधील कथा आहे. त्यामुळे आपण तेवढ्यापुरताच विचार करू. ‘बुक आॅफ जॅनेसीस’मध्ये असं म्हटलंय की, ईश्वराने जमिनीवरच्या धुळीतूनच आद्य मानवाची- अॅडमची निर्मिती केली आणि मग त्याने आपल्या या निर्मितीत प्राण फुंकले. अशाप्रकारे पहिला मानव, ‘अॅडम’ जन्माला आला. तीच मानव निर्मितीची कथा चित्ररूपाने ‘द क्रिएशन आॅफ अॅडम’ या प्रसिद्ध चित्रात रंगवली आहे. चित्रकार आहे- ‘मायकेलँजोलो’.
मायकेलँजोलो ब्यूनारोटी किंवा नुसताच मायकेलँजोलो हा सोळाव्या शतकातला प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार आणि कवीसुद्धा होता. तो विशेषत: शिल्पकार म्हणून ओळखला जातो. पण त्याने काढलेली काही चित्र अजरामर झालीत. रोममधल्या व्हॅटीकन सिटीमधील सिस्टीन चॅपेल या चर्चच्या नूतनीकरणाचं काम सोळाव्या शतकाच्या सुरुवातीलाच हाती घेण्यात आलं. त्यासाठी त्या काळातल्या अनेक प्रसिद्ध कलावंतांना पाचारण केलं होतं. त्यात मायकेलँजोलो पण होता. तत्कालीन पोपने त्याला बोलावून या सिस्टीन चॅपेलचे भव्य छत रंगविण्याचं काम सोपविलं. आधी त्याला या छतावर येशूचे १२ अनुयायी- अॅपोस्टल्स रंगवायला सांगितलं होतं. पण ते मायकेलँजोलोला पटलं नाही. त्याने नकार दिला. शेवटी पोपने त्याला मोकळीक दिली की त्याला हवी ती चित्रं त्याने छतावर रंगवावी.
हे कलास्वातंत्र्य मिळाल्यावरच त्याने रंगकलेला सुरूवात केली. सन १५०८ ते १५१२ या चार वर्षांमध्ये अहोरात्र कष्ट घेऊन मायकेलँजोलोने सिस्टीन चॅपेलचं छत रंगवून पूर्ण केलं.
या छतावरच्या मुख्य भागात त्याने ‘बुक आॅफ जेनेसीस’मधील नऊ वेगवेगळे प्रसंग रंगविले आहेत. त्यातला ‘क्रिएशन आॅफ अॅडम’ हा प्रसंग कला जगतात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. दा विंचीच्या ‘लास्ट सपर’च्या खालोखाल ज्या चित्राची आजपर्यंत सगळ्यात जास्त नक्कल झालीय ते चित्र म्हणजे ‘क्रिएशन आॅफ अॅडम’! याच चित्राला ‘द ब्रेथ आॅफ लाईफ’ असंही म्हणतात. कारण त्यात मानवी शरीरात ईश्वराने प्राण फुंकलेले दाखवले आहे.
ईश्वर आणि मानव यांच्या नात्याचं, मानव ही ईश्वराची निर्मिती आहे, या विश्वासाचं एक प्रतीक म्हणून या चित्राकडे पाहिलं जातं. या चित्रात अॅडम आणि ईश्वर यांची एकमेकांच्या जवळ असलेली हाताची बोटं, एवढाच चित्र तुकडासुद्धा कित्येकांनी वापरलाय.
‘मानवतेची सुरुवात’ म्हणून ती बोटं दाखविली जातात. खरं तर, या एका छोट्याशा प्रतीकामुळे हे चित्र अजरामर झालंय. ती कला जगतात ‘जीवनाची तर्जनी’ मानली जाते.
हा प्रसंग जरी ‘जेनेसीस’मधला असला तरी त्याचा ‘साक्षात्कार’ हा पूर्णपणे मायकेलँजोलोचा, स्वत:चा आहे. तो प्रसंग त्याच्या अंतर्मनाला जसा दिसला तसा त्याने रंगवलाय. त्यामुळे त्यातील गर्भित प्रतीकं कोणती हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. मूळात मायकेलँजोलो हाडाचा शिल्पकार असल्याने मानवी शरीराचा त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याला मानवाकृती रेखाटण्यात जास्त रस होता.
पार्श्वभूमी किंवा निसर्गदृष्य त्याच्या दृष्टीने दुय्यम होते. या चित्रातही आपल्याला प्रामुख्याने मानवाकृतीच नजरेत भरतात.
चित्रातला अॅडम नग्नावस्थेत आहे. कारण त्याची निर्मिती नुकतीच झाली आहे. ईश्वराच्या अंगावर मात्र पांढरा अंगरखा आहे. अॅडम विलक्षण प्रमाणबद्ध शरीरयष्टीचा आहे. पण त्या शरीरात अजून त्राण नाही, उर्जा नाही. तो थकला-भागलेला वाटतो. या उलट ईश्वर शक्तीने रसरसलेला आहे. त्याने पुढे केलेला हात कमालीचा सशक्त आहे. आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने तो अॅडमला जीवनशक्ती देतोय.
अॅडमच्या हाताची बोटं किंचित झुकलेली आहेत. कारण अजून उर्जा मिळायची आहे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दोघांची बोटं अगदी जवळ असली तरी टेकलेली नाहीत. त्यात थोडं अंतर आहे. कितीही झालं तरी ईश्वर हा मानवापेक्षा वरचढ आहे. त्यांच्यात थोडं अंतर राहणारच, असं चित्रकाराला त्यातून सुचवायचं आहे. ईश्वराच्या भोवताली असलेल्या बारा मनुष्याकृती नक्की कोणाच्या यावर अनेक मते-मतांतरे आहेत. काही चित्रं समीक्षकांच्या मते ईश्वराभोवती असलेलं लाल वस्त्र त्याच्या आकारावरून मानवी गर्भाशयाचं प्रतीक आहे आणि त्यात बारा जिवात्मे आहेत.
चित्रांची ही एक मोठी गंमत असते नाही? काढणारा काढून मोकळा होतो आणि मग बाकीचे लोक वर्षानुवर्षे त्याचा अर्थ लावत बसतात. पण चित्रसुद्धा विनोदासारखं असतं - ते ‘समजून’ घ्यायचं असतं - ‘समजावून’ सांगायचं नसतंच मुळी....!