मानववंशाचा पाळणा, पृथ्वीची निर्मिती ते आदिमानव काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:17 PM2018-03-06T13:17:15+5:302018-03-06T13:17:15+5:30
होमोसेपियन या आत्ताच्या मानववंशाची भूमी म्हणून पृथ्वीतलावर आफ्रिका खंडाला ओळखले जाते. मानववंशाचा पाळणा असलेल्या या भूमीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने भरपूर प्रयत्न आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत माणसाला त्याच्या पूर्वजांविषयी आणि भूतकाळाविषयी असलेल्या स्वाभाविक जिज्ञासा, उत्सुकता यांची पूर्ती करण्यात यश मिळाले आहे. मानवाच्या उत्क्रांतीची भूमी म्हणून सांस्कृतिक वारशाचे संरक्षण, आदिमानवांचे अवशेष, त्यांच्या कलेचे नमुने मोजक्या गुहांमध्ये जतन करून ठेवले आहेत.
२-३ अब्ज वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमधून जात अखेर आदिमानवापासून मानवाचा पूर्वज निर्माण झाला. त्याची इत्थंभूत माहिती याठिकाणी गाईड देतात. मानवी उत्क्रांतीचे टप्पे शास्त्रोक्त पद्धतीने मांडले आहेत. किचकट असलेला विषय कल्पक रचनेद्वारे सोपा करून दाखविला आहे. आदिमानव काळातील कुटुंबे, त्यांचे दिनक्रम हे शिल्परूपात मांडले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तो काळ जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपला चेहरा अभ्यासून आपला पूर्वज आदिमानव कसा असेल, असे भाकीत वर्तविणारी छायाचित्रे उत्सुकता चाळवितात.
नैसर्गिकता जपत दगड, झाडे आणि डोंगराचा परिणामकारक वापर करीत या गुहांचे सौंदर्य खुलविले आहे. गुहा म्हणजे खरेतर निसर्गाचा चमत्कार आहे. त्याचा आदिमानवांनी शोध लावला. निवाºयासाठी उपयोग केला. या गुहांची निवड करताना पाणी, प्रकाश यांना महत्त्व देण्यात आले असल्याचे जाणवते. त्याचा अभ्यास तेथील शास्त्रज्ञ, पुरातत्त्व तज्ज्ञ करीत आहेत. काही गुहांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.
आदिमानव काळातील गुहा आणि त्याला पर्यटन स्थळ बनविण्यासाठी आताच्या माणसांनी केलेले प्रयत्न पाहून दाद द्यावीशी वाटते. कृत्रिम प्रकाशयोजना, सैर करण्यासाठी सुरक्षित पायºया आणि कठडे यामुळे गुहेतील प्रवास सुलभ आणि मोहक होतो.
गुहेत असलेले शुद्ध आणि नैसर्गिक पाण्याचे झरे पाहून जसे अचंबित व्हायला होते तसेच गुहेच्या छतातून झिरपणाºया पाण्याच्या थेंबानी दगडांच्या कोरल्या गेलेल्या आकृती पाहून निसर्गाच्या चमत्काराला नमन करावेसे वाटते. तेथील अंधारलेले बोगदे, श्वास रोखून धरत वाकत, रांगत केलेली सैर, गारठा आणि स्मशान शांततेला असलेली खळखळणाºया पाण्याची लयबद्ध साथ असे वातावरण पुन्हा आपल्याला अब्जो वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाते.
स्टर्कफोंटेश
अद्भुत गुहा : मारोपेंग, स्टर्कफोंटेश आणि कांगो याठिकाणच्या गूढरम्य गुहा पाहिल्या. मारोपेंग पर्यटन केंद्रापासून १० कि.मी. अंतरावर स्टर्कफोन्टेश ही जगप्रसिद्ध गुहा आहे. १९९९ मध्ये या गुहेला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. विटवॉटरस्टँड या विद्यापीठाची मालकी या गुहेवर आहे. तेथे संशोधन कार्य सुरू आहे.
मारोपेंग पर्यटन केंद्र
मारोपेंग हे पर्यटन केंद्र एका डोंगराच्या पायथ्याशी कृत्रिम गुहा बनवून तयार केले आहे. जगाची सुरुवात कशी झाली, पृथ्वीच्या इतिहासातील ठळक घटना कोणत्या हे शास्त्रीय पद्धतीने पण सहजसोप्या भाषेत आणि चित्र-शिल्पाच्या माध्यमातून मांडले आहे. कृत्रिम जलाशयातून सैर करताना पृथ्वीच्या निर्मितीचे टप्पे, बर्फवृष्टी, पाऊस याची प्रचिती घडून येते. दृकश्राव्य माध्यमातून पृथ्वी आणि उपखंडाच्या निर्मितीची सुरस कथा सांगितली जाते.
- मिलिंद कुलकर्णी