वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:47 PM2018-10-14T22:47:49+5:302018-10-14T22:50:28+5:30
वडिलांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांविरुद्ध एक वर्षानंतर मुलाच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पाचोरा : वडिलांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांविरुद्ध एक वर्षानंतर मुलाच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६ सप्टेंबर २०१७ रोजी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सहायक लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या आसाराम पोसल्या पाडवी (मयत) यांनी गाडगेबाबा नगर मधील भाड्याच्या घरात ६ सप्टेंबर २०१७ रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी मयताने मृत्यूपूर्वी संदेश पाठवून आॅफिसच्या कामाचा त्रास होत असून कार्यालयातील आर.जी.मिश्रा, अतुल पाटील हे मानसिक छळ करून त्रास देत असल्याचा मेसेज पाठविला. त्यातच तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना सर्व त्रासाची कल्पना व अडचणी सांगूनही न्यायाची भूमिका न घेता तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भात मयताने मृत्यूपुर्व चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार मुलगा स्वप्नील पाडवी याने पाचोरा पोलिसात दिल्यावरून तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.