ग.स.चे माजी अध्यक्ष विलास नेरकर, संजय ठाकरेविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:06+5:302021-02-10T04:16:06+5:30
जळगाव : ग.स. सोसायटीत झालेल्या कर्मचारी भरतीत विजय प्रकाश पाटील या कर्मचाऱ्याच्या नियमित वेतन श्रेणीचा बनावट आदेश काढल्याप्रकरणी ...
जळगाव : ग.स. सोसायटीत झालेल्या कर्मचारी भरतीत विजय प्रकाश पाटील या कर्मचाऱ्याच्या नियमित वेतन श्रेणीचा बनावट आदेश काढल्याप्रकरणी संस्थेचे माजी अध्यक्ष विलास यादवराव नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे या दोघांविरुद्ध मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन अध्यक्ष मनोजकुमार आत्माराम पाटील (वय ५०, रा. रणछोडनगर) यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून, त्यांनीच फिर्याद दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नेरकर हे ग.स. सोसायटीचे अध्यक्ष असताना फेब्रुवारी २०१९ मध्ये ३६ लिपिक व २७ शिपाई, अशा एकूण ६३ पदांची भरती करण्यात आलेली होती. प्रथम नियुक्तीपत्रावर अध्यक्ष म्हणून विलास नेरकर यांची स्वाक्षरी होती, तर काउंटर स्वाक्षरी व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे व प्रशासन अधिकारी जयंत साहेबराव साळुंखे यांच्या होत्या. १९ ऑगस्ट २०१९ रोजी या कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला, तेव्हा मनोजकुमार पाटील हे अध्यक्ष होते. या लिपिक व शिपाई यांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबबत आदेश तयार करण्यात आले. प्रशासन अधिकारी जयंत साळुंखे व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांनी सही केल्यानंतर अध्यक्ष म्हणून पाटील यांनी सही केली असता, त्यात विजय पाटील यांना नियमित वेतन श्रेणीचा आदेश देण्यात आलेला नसल्याचे उघड झाले. याची माहिती नेरकर व ठाकरे यांना आधी होती. त्यामुळे दोघांनी १९ ऑगस्ट २०१९ रोजीचा बनावट आदेश तयार करून संस्थेचे फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली.