चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखविणाऱ्या सभापतीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:53 PM2018-10-22T22:53:26+5:302018-10-22T22:54:11+5:30
एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाºया चाळीसगाव पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीविरुद्ध सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाºया चाळीसगाव पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीविरुद्ध सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असणारे शिक्षक व चाळीसगाव पालिका शिक्षण सभापती सूर्यकांत ऊर्फ बंटी ठाकूर याने ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवत छेड काढली. ‘चित्रफीत पाहून तुला काय वाटते,’ अशी विचारणा विद्यार्थिनीला केली. हा प्रकार गावात वेगाने पसरला. गेल्या महिन्याभरापासून याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत मुख्याध्यापकांना कारवाई करण्याविषयी धारेवर धरले. मुख्याध्यापकांनी या शिक्षकाने केलेल्या प्रकाराबाबत संस्थाचालकांना लेखी पत्रही दिले. अखेरीस विद्यार्थिनीच्या पालकांनी बदनामी होत असल्याने सोमवारी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची भेट घेऊन झालेला प्रकार कथन केला. विद्यार्थिनीच्या लेखी जबाबावरून गुन्हा र.नं. १२५/२०१८ प्रमाणे ३५४ (अ) ५०९ ११.१२ बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोस्को) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सपोनि राजेंद्र रसेडे करीत आहे.