एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची बनावट आॅडीओ क्लीप प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:58 PM2018-08-08T17:58:24+5:302018-08-08T18:01:45+5:30
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसे यांनी स्वत:च याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याआधी आकाशवाणी केंद्रात खडसे यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
खडसे यांच्या आवाजातील बनावट आॅडीओ क्लीप प्रसारीत झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर खडसे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे तक्रार केली होती. मंगळवारी खडसे यांना आवाजाचे नमुने घेण्यासाठी आकाशवाणी केंद्रात बोलावण्यात आले होते. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, सुनील कुराडे, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम आदी उपस्थित होते.
एकनाथराव खडसे यांच्या आवाजाचे नमुने आकाशवाणी केंद्रात घेण्यात आले. त्याचे सीलबंद पाकीट केंद्राकडून मिळाले. आॅडीओ क्लीपचा आवाज व आज घेण्यात आलेला आवाज असे दोन्ही नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
-सुनील कुराडे, तपासाधिकारी