निम्न तापी प्रकल्पाच्या चालकासह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:30+5:302021-06-23T04:12:30+5:30
अमळनेर : युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर ...
अमळनेर : युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना घडल्यापासून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
सागर एकनाथ पाटील या युनियन बँकेतील शिपायाने ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सागर याने त्याचे वडील एकनाथ पंढरीनाथ पाटील यांना मी नायगाव येथे येत आहे, असा फोन केला होता. मात्र सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास तो बँकेत आला नाही म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी चौकशी केल्यावर सागरने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी भेट दिल्यावर त्यांना सागरने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले. त्यात त्याने स्वप्नील विलास शिंदे उर्फ सैंदाने रा. अमळनेर व संतोष साहेबराव पोरजे रा.त्र्यंबकेश्वर नाशिक (हल्ली मुक्काम निम्न तापी प्रकल्प) हे दोघे मानसिक छळ करीत असल्याचे म्हटले होते. सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली होती. तर सागरचे वडील एकनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरीसुद्धा या छळाबाबत उल्लेख केला होता. मात्र नेमका छळ कशावरुन होत होता हे स्पष्ट नाही. याबाबत २२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत. दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत.