चाळीसगाव आगारप्रमुख व वरिष्ठ लिपिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:33 PM2021-06-20T23:33:51+5:302021-06-20T23:34:55+5:30
कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला त्रास दिल्यावरून चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : विचित्र नजरेने पाहून मनाला लाजवेल असे कृत्य करून कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला त्रास दिल्यावरून चाळीसगाव आगाराचे आगार प्रमुख संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिसात रविवारी सायंकाळी दाखल झाला.
चाळीसगाव आगारात आगारप्रमुख संदीप निकम व वरिष्ठ लिपिक नितीन पाठक हे दोघेही कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला मुद्दामहून रात्री उशिरापर्यंत ड्युटी लावणे, एकाचवेळी अनेक विभागाची कामे देणे, आगारप्रमुख यांच्या केबिनमध्ये बराच वेळ विनाकारण उभे करून ठेवणे व विक्षिप्त नजरेने पाहणे, अशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत होते. रात्रीची ड्युटी बदलण्याबाबत अर्ज दिला असता त्यावर कारवाई न करता उलट तिला अधिक त्रास तिला दिला जात होता. ‘तू बाहेर जिल्ह्याची आहेस. तुझे अजून लग्न होण्याचे बाकी आहे. तू माझ्या विरोधात जाशील, तर तुला महागात पडेल’, असा दम निकम यांनी तिला दिला, असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.
दि. २ जून रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान आगारामधील लेखा विभागात काम करीत असताना आगार प्रमुख निकम तिला म्हणाले की, तू माझी इच्छा पूर्ण करीत नाहीस. म्हणून तुला त्रास देतो. तू मला आवडतेस, हा प्रकार वरिष्ठ लिपिक भावसिंग राजपूत व चालक मुस्तक कमरुद्दीन शेख यांनी ऐकला. दरम्यान, १२ जून रोजी तिला निलंबित करण्यात आल्याचे फिर्यादीत तिने म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसात आगारप्रमुख संदीप निकम व वरिष्ठ लिपिक नितीन पाठक यांचेविरुद्ध भादंवि ३५४ अ, ३५४ अ (१)(आय , ३५४डी, ५०६नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.