आदेश झुगारणाऱ्या २२५ जणांविरुध्द गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:42 PM2020-04-23T12:42:44+5:302020-04-23T12:43:16+5:30
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊनचे आदेश असून जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मात्र तरीदेखील विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एमआयडीसी पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरुन नियमांचे उल्लंघन करणाºया २२५ जणांविरुध्द कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल झाले असून १२० जणांचे वाहने जप्त केली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया एमआयडीसी पोलिसांनी केल्या आहेत.
दरम्यान, कारण नसताना रस्त्यावर फिरणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे यासह इतर प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या व जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेर न फिरता घरातच राहणे अपेक्षित असून त्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करूनही त्यात फारसा फरक न पडल्याने आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यात १०० दुचाकी, १५ रिक्षा, २ ट्रक व ३ कार जप्त करण्यात आल्या आहेत.
अवैध दारू व रसायन जप्त
बनावट दारु पोलिसांनी ३५ गुन्हे दाखल केले असून २२ जणांना अटक केली आहे. दारु, रसायन, विदेशी व गावठी दारु तसेच वाहने असा ६ लाख २६ हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक निरीक्षक अमोल मोरे, संदीप हजारे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे, विजय नेरकर, दिनकर खैरनार, बळीराम सपकाळे, संजय भोई, विजय पाटील, नितीन पाटील, सचिन पाटील, सचिन चौधरी, योगेश बारी, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, रतिलाल पवार, संदीप पाटील, इम्रान सय्यद आदी जणांच्या पथकाने या ही कारवाई केली.