७ सराफ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल,१२ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:02 PM2020-05-19T13:02:20+5:302020-05-19T13:02:32+5:30
जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात सोमवारपासून चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत अत्यावश्यक ...
जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात सोमवारपासून चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना बंदी घालण्यात आली असताना सोमवारी शहरात अनेक व्यवसायिकांनी आपले दुकाने थाटली होती. त्यामुळे मनपा आयुक्त संतोष वाहूळे यांनी सराफ व्यावसायिकांच्या ७ दुकानांसह एकूण १२ दुकाने सील केली आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सराफ व्यवसाय करणाऱ्या ७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने, मॉल, सराफ बाजार इतर व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यास बंदी घातली असताना सोमवारी शहरात वेगळेच वातावरण दिसून आले.
राजकमल चौकातील पाच दुकाने सील
सराफ बाजारातील दुकानांवर कारवाई केल्यानंतर राजकमल चौक परिसरातील पाच हार्डवेअर व इलेक्ट्रिक दुकानेदेखील सील करण्यात आली. इलेक्ट्रिक दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचेही पालन न केल्याने संबधित दुकानदारांना प्रत्येकी ५०० रुपयांचाही दंड ठोठावण्यात आला. तसेच या ठिकाणी उपस्थित ग्राहकांनी तोंडावर मास्क न लावल्याने सात जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, मनपाने सील केलेल्या १२ दुकानदारांना नोटीस बजावून, त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच दुकाने पुन्हा उघडण्याबाबतचा विचार केला जाणार आहे.
मनपाचे पथक पोहचल्यानंतर गोंधळ
मनपाचे पथक सुभाष चौक भागात आल्यानंतर अनधिकृत भाजीपाला विक्रेते, हातगाडी चालकांची कारवाईच्या भितीने एकच पळापळ सुरु झाली. त्यामुळे काही काळ या भागात प्रचंड गोंधळ उडाला. उपायुक्त वाहुळे यांनी सराफ बाजारात पोहचल्यानंतर उघडलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनपाच्या पथकाने दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरु केली. काही विक्रेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई न करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाºयांचे आदेश नसताना दुकाने सुरु केल्याने सराफ बाजारातील सात दुकाने सील करण्यात आली.
या दुकानांवर करण्यात आली कारवाई
निर्मल ज्वेलर्स, डी.एस.प्लाझा ज्वेलर्स, सीसीटीव्ही शॉप, आरती ज्वेलर्स, नंदुरबारकर ज्वेलर्स, बाविस्कर ज्वेलर्स, भरत हार्डवेअर, कन्हैया अगरबत्ती, उध्दव ट्रेडर्स, एचटी सिक्कोर ही सात दुकाने सील करण्यात आली. सात सराफ व्यावसायिकांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.