परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:13 PM2020-04-23T22:13:31+5:302020-04-23T22:14:28+5:30

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी

Crimes will be filed against those coming from the district - Collector | परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल - जिल्हाधिकारी

परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल - जिल्हाधिकारी

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकाडाऊनच्या काळातही इतर जिल्ह्यातून काही नागरिक जळगाव जिल्ह्यात येवून राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी इतर जिल्ह्यातून कोणाला आपल्या जिल्ह्यात, गावात येवू देवू नये, कोणी नागरिक आपल्या जिल्ह्यात आल्यास त्याची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. तसेच परजिल्ह्यातून येणाºयांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
परप्रांतीयांना स्थानिक पातळीवर रोजगार
डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत निवारागृहात असलेल्या राज्याच्या इतर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मुळगावी जायचे असल्यास तशी व्यवस्था करावी. परप्रांतातील नागरिकांबाबत शासनाच्या सूचना येईपर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले. जळगाव येथील कोरोना रुग्णालयात सध्या ११८ व्यक्ती दाखल आहेत. येथील परिस्थिती लक्षात घेता कोरानाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर तालुक्याच्या ठिकाणीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात यावे, आवश्यकता भासत असल्यास त्यांना तेथेच अ‍ॅडमिट करुन घ्यावे तसेच ज्या व्यक्तींना सामाजिक क्वारंटाईन करावयाचे आहे, त्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी ठेवावे, त्यांना कोरोना रुग्णालयात आणू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठ्यांवरही होणार कारवाई
गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील तपासणी नाक्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असता बुलढाणा, औरंगाबाद, मालेगाव या हॉटस्पॉटमुळे जिल्ह्याला अधिक धोका आहे. त्यातच धुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमळनेर, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यातील नागरिकांना अधिक सजग रहावे. यापुढे इतर जिल्ह्यातून कोणीही नागरिक आपल्या जिल्ह्यात आल्यास तो ज्या मार्गाने आला त्या मार्गावर बंदोबस्तास असलेल्या अधिकाºयांबरोबरच तो ज्या गावात आला त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला असून येणाºया व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचे पालन करावे, शासनाच्या नियमांचे पालन करावे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मीच माझा रक्षक ही भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यावी, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले आहे.
धान्यासाठी गर्दी करू नये
स्वस्त धान्य वाटपाच्यावेळी स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी त्या भागातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. शासनाच्या नियमानुसार पात्र सर्व लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार असल्याने नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले.

Web Title: Crimes will be filed against those coming from the district - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव