गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:58+5:302021-05-28T04:12:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला २० पेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला २० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविल्याप्रकरणी त्यांची मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांच्या विरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गफ्फार मलिक यांचे २४ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची अंत्ययात्रा शनीपेठेतील बैतूल मलिक नावाच्या बिल्डींगपासून काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत राहत्या घरापासून तर इदगाह मैदानापर्यंत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी, जमावबंदी व साथरोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. या अंत्ययात्रेत या कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भादंवि कलम १८८, २६९ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१ ब प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनी पेठ पोलीस ठाण्याचे अंमलदार गिरीश दिलीप पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. तपास उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहे.