वर्षभरानंतर व्यापारनगरीपुढे पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:52+5:302021-04-06T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वर्षभरापासून अडचणींना सामोरे जात असलेल्या व्यापार क्षेत्रासमोर आता पुन्हा लॉकडाऊनने संकट उभे केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वर्षभरापासून अडचणींना सामोरे जात असलेल्या व्यापार क्षेत्रासमोर आता पुन्हा लॉकडाऊनने संकट उभे केले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेला व्यापार सहा महिन्यानंतर सुरू झाला व आता तो पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याच्या विचाराने व्यापारी वर्ग धास्तावला आहे. गेल्या वर्षाप्रमाणे ऐन हंगामाच्या काळातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजार यासह विविध व्यावसायिकांनी करोडो रुपयांचा माल खरेदी करून ठेवलेला असताना आता यंदादेखील तो पडून राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी मार्च महिना उजाडला आणि कोरोना आर्थिक संकट घेऊन आला. जळगावातील व्यापार मोठा असल्याने येथील विविध व्यावसायिकांनी उन्हाळ्यात लागणारे साहित्य, उपकरणे, लग्नसराई यादृष्टीने सर्व माल खरेदी करून ठेवला. मात्र खरेदीच्या हंगामातच दुकाने बंद असल्याने करोडो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कापड बाजार, सुवर्ण बाजार, बांधकाम क्षेत्राशी निगडित व्यवसाय सर्वच ठप्प झाले होते.
यंदाचा हंगाम साधण्यावरही ‘पाणी’
गेल्या वर्षाच्या आर्थिक संकटातून व्यावसायिक आता हळूहळू सावरत असताना यंदाचा हंगाम साधला जाणार असे वाटत होते. त्याच वेळी नेमका पुन्हा संसर्ग वाढल्याने सरकारने लॉकडाऊन व अनेक निर्बंध घातल्याने यंदाचा हंगाम हातचा जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. यामुळे व्यापारी पुन्हा आर्थिक संकटात सापडला जातो की काय अशी चिंता सर्वांनाच लागली आहे.
करोडो रुपयांचा माल पडून
उन्हाळ्यामध्ये कुलर, फ्रीज, पंखे, एसी यांच्या खरेदीसह मुहूर्त पाहून विविध वस्तूंची खरेदी केली जाते. त्यादृष्टीने व्यावसायिक मालाची उपलब्धता करून ठेवतात. यंदादेखील पुरेसा माल व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवला. मात्र पुन्हा अर्थचक्र मंदावण्याची चिन्हे व्यापाऱ्यांना चिंतित करीत आहे.
कापड व्यावसायिक चिंतेत
गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून झालेल्या लाॅकडॉऊनमुळे कापड व्यवसायालाही मोठा फटका बसला. या काळात लग्नसराई असली तरी दुकाने बंद असल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यात मे महिन्यात लाॅकडॉऊनला शिथिलता दिली गेली खरी मात्र शहरातील व्यापारी संकुले सुरू न झाल्याने कापड व्यवसाय देखील बंद होता. त्यानंतर ५ ऑगस्टपासून व्यापारी संकुल सुरू झाले व कापड व्यवसायाला पुन्हा गती येऊ लागली. सणासुदीच्या काळात काहीसी भर निघाली. मात्र आता पुन्हा कापड व्यावसायिकांपुढेदेखील चिंता निर्माण झाली आहे.
बांधकाम साहित्य विक्रीपुढेही संकट
लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंना मुभा देण्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यवसायालादेखील मोठा फटका बसणार आहे. सिमेंट, स्टील, टाइल्स व इतर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे व्यवहारदेखील यामुळे संकटात सापडण्याची चिंता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
---------
गेल्यावर्षी ऐन हंगामामध्ये बाजारपेठ बंद राहिली. संपूर्ण माल पडून होता. यंदादेखील ऐन हंगामाच्या काळातच लाॅकडाऊनचे संकट आल्याने पुन्हा व्यवसायाची चिंता वाढली आहे.
- विजय देसर्डा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते
लॉकडाऊन व लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित व्यवसाय व हार्डवेअर व्यवसाय देखील गेल्या वर्षाप्रमाणे ठप्प होण्याची सर्वांना चिंता आहे. व्यवसायांना मुभा देऊन अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- युसुफ मकरा, बांधकाम साहित्य व हार्डवेअर साहित्य विक्रेते