पावसाअभावी दोन हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार लागवडीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:51+5:302021-07-05T04:11:51+5:30
यंदाचे वर्ष वेळेवर व भरपूर पावसाचे असणार असल्याचे हवामान खात्याने वारंवार ‘ब्रेकिंग न्यूज’ सुरू ठेवल्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याचा आत्मविश्वास ...
यंदाचे वर्ष वेळेवर व भरपूर पावसाचे असणार असल्याचे हवामान खात्याने वारंवार ‘ब्रेकिंग न्यूज’ सुरू ठेवल्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याचा आत्मविश्वास बळावत गेला. मृग नक्षत्रातील पेरणी व लागवड फलदायी ठरते, म्हणून कळमसरे परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बी-बियाणे शेतात ओतले. परंतु सर्वच नक्षत्रात दांडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यातही उन्हाचेच चटके दिले. मध्यंतरी थोड्या फार सरी बरसल्या, त्यात कापूस बियाण्यांना अंकुर फुटले. मात्र खाली जमीन कोरडी असल्याने कोंब जळून खाक झाले. तीच गत मका, ज्वारी-बाजरी पिकाची झाली. यामुळे कळमसरे गावातील ६५० हेक्टर कापूस व १५० हेक्टर मका पीक, पाडळसे-१५० हे., निम-२०० हे., तांदळी-१५० हेक्टर, शहापूर-१७५ हेक्टर, वासरे - ११० हेक्टर आणि खेडी-१०० हेक्टर मिळून १,५०० हेक्टर कापूस पीक तर ३५० हेक्टर मका व ८० हेक्टर ज्वारी-बाजरी पिकांचा उगवत्या कोंबांना जमिनीतच गाडून घ्यावे लागले.
कावळ्याचे घरटे अन् पावसाची दांडी
हवामान खात्याचा अंदाज साफ चुकला अन् जुन्या जाणत्या शेतकऱ्यांच्या नजरा झाडावरील कावळ्यांच्या घरट्यांकडे वळल्या. कळमसरे गावाबाहेर शारदा हायस्कूल आवारातील झाडांच्या अतिउंच फांदीवर कावळ्यांनी यंदा घरटी बनविली आहेत. पाऊस उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचे हे संकेत असल्याचे बोलले जात आहे.