मनपावर बँक खाती सील होण्याचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:20+5:302021-03-14T04:16:20+5:30
जळगाव : महापालिकेकडे महसूल विभागाची अकृषक साऱ्याची सुमारे १३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश ...
जळगाव : महापालिकेकडे महसूल विभागाची अकृषक साऱ्याची सुमारे १३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्याने पुन्हा जळगाव मनपावर बँक खाती सील होण्याची नामुष्की ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या साऱ्याच्या रकमेला महापालिका प्रशासनाने आक्षेप घेतला असून, खाते सील होणार नसल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे.
महसूल विभागाने मार्च एण्डची कारवाई करत विविध आस्थापनाकडे थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात ज्या आस्थापनाकडे थकबाकी आहे, अशा आस्थापनाचे बँक खाती गोठविण्याचे आदेश प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. जळगाव महापालिकेकडेदेखील सन २००१ पासूनची अकृषक साऱ्याची सुमारे १३ ते १४ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महसूल विभागाने अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनदेखील भरणा न केल्याने आता महसूल विभागाने महापालिकेची बँक खाती गोठविण्याचे आदेश संबंधित बँकांना दिले आहेत.
दरम्यान, या वसुलीबाबत महापालिका प्रशासनाने महसूल विभागाशी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे, तसेच यातील काही थकबाकीबाबत मनपाने आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे खाती सील करू नये, अशी विनंतीदेखील महसूल विभागास केली आहे. दरम्यान, यासंदर्भात आयुक्त यांची जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाती सीलची कारवाई केली जाणार नसल्याचा विश्वास मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.