संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:43 PM2018-08-06T14:43:41+5:302018-08-06T14:49:55+5:30

विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख.

Critical leader He is the commander of the Digvijayi commander | संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती

संकटमोचक नेता ते दिग्वीजयी सेनापती

Next

विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख.
गिरीश महाजन. हसतमुख चेहरा, खळाळता उत्साह, सासरे बनले असले तरी प्रकृतीस्वास्थ्य एखाद्या तरुणाला लाजविणारे, त्यासाठी रोज नियमित व्यायाम करणारे, मंत्रिपदाचा कोणताही प्रोटोकॉल वागण्या-बोलण्यात न जाणवू देणारे, सहजपणे समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून मोकळा संवाद साधणारे असे व्यक्तिमत्व. राजकारणात असले तरी कोणताही मुखवटा धारण न करता सहज, मोकळेपणाने वावरणाऱ्या या नेत्यावर सध्या मोठा प्रकाशझोत आहे. संकटमोचक नेता, दिग्वीजयी सेनापती अशी विशेषपणे त्यांना शोभून दिसत आहे. कारण कामगिरी आहेच तशी.
जळगाव महापालिका निवडणुकीत सुरेशदादा जैन यांच्या ‘युती’च्या प्रस्तावाला प्रामाणिकपणे फलद्रुप करण्यासाठी प्रयत्न, खडसेंनी उघडपणे तर काहींनी अंतर्गत विरोध केल्याने युती होऊ शकली नसली तरी त्याची जाहीर कबुली देण्याचा मोठेपणा, निवडणुकीचे नेतृत्व कुणी करावे, याविषयी संभ्रम सुरु असताना स्वत: पुढाकार, ‘युती’फिसकटलेल्या शिवसेनेतून ललित कोल्हे, ढेकळे यांच्यासारखे मोहरे ‘भाजपा’त खेचण्याची व्यूहरचना, पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा कल्पक वापर या सगळ्यांमध्ये गिरीश महाजन आघाडीवर होते. खडसे यांची उघड नाराजी, निष्ठावंतांचे बंड, मराठा आरक्षणाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची होऊ न शकलेली सभा अशी विपरीत स्थिती असतानाही त्यावर महाजन यांनी कौशल्याने मात केली.
अर्थात महाजन यांची ‘निवडणूक नीती’ ज्यांना माहित आहे, त्यांना यात नवल वाटलेले नाही. जळगाव जिल्हा परिषदेत बहुमत नसताना त्यांनी भाजपाची सत्ता आणली. जामनेरात काँग्रेस, राष्टÑवादीच्या मातब्बर नेत्यांचा प्रवेश सोहळा करवून पालिकेत ‘शतप्रतिशत’ यश मिळविले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्व.चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास यांनी ऐनवेळी सेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या राजेंद्र गावीत यांना ‘नंदुरबार कनेक्शन’वापरुन भाजपाची उमेदवारी देऊ केली. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे आणि राष्टÑवादीला मात देत भाजपाची प्रथमच सत्ता आणली. हे यशाचे सोपान चढत असताना कोठेही त्याचे श्रेय स्वत: कडे न घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि सरकारच्या कामगिरीची पावती म्हणून हा विजय झाला, अशी नम्र भावना प्रत्येकवेळी त्यांनी बोलून दाखवली. संकटमोचक नेता म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर आलेले संकट लिलया दूर केले. किसान सभेने नाशिक ते मुंबई काढलेला मोर्चा असो की, आषाढी वारीला पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन असो, मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळून हातातील काम सोडून ते तातडीने हजर होतात. यशस्वी शिष्टाईचा प्रयत्न करतात. पंढरपुरात तर त्यांची गाडी संतप्त आंदोलनकर्त्यांनी तासभर अडकवून ठेवली होती, पण तरीही चिकाटीने ते परिस्थितीला सामोरे गेले. जीव धोक्यात घालून, प्रतिष्ठा पणाला लावून ते करीत असलेली कामगिरी अमृूल्य अशीच आहे. स्वाभाविकपणे ते मुख्यमंत्री आणि पक्षाच्या गळ्यातील ताईत बनले.
तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी अशी यशस्वी राजकीय नेत्याची व्याख्या केली जाते, त्यात महाजन चपखलपणे बसतात. म्हणूनच अशा मोहिमा ते यशस्वी करु शकतात. त्यांचे कोणीही शत्रू नाही, पण सगळेच मित्र आहेत. पक्षीय, वैचारिक अभिनिवेश न बाळगता ते काम करतात आणि यशस्वी होतात. जामनेरात ईश्वरलाल जैन यांच्याशी संघर्ष करीत ते राजकारणात घडले, पण त्यांनाच राजकीय गुरु मानून हितचिंकांच्या यादीत समाविष्ट केले. त्यांच्या भोवतीची प्रभावळदेखील भिन्न स्वरुपाची असते. अनिल चौधरी, ललित कोल्हे, कैलास सोनवणे, उन्मेश पाटील, शिरीष चौधरी, श्रीराम व श्रीकांत खटोड, गुरुमुख जगवाणी, चंदूलाल पटेल, सुनील झंवर, राजू अडवाणी, भगत बालाणी, नंदू अडवाणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्यांच्या सभोवताली असते.
महाआरोग्य शिबिरासारखा मोठा कार्यक्रम असो की, कोणतीही निवडणूक महाजन यांचा उत्साह, तडफ बघण्यासारखी असते. विद्यार्थी परिषदेत घडल्याने अशा उपक्रमांचा त्यांचा पूर्वानुभव दांडगा आहे. त्याची परिणती विजयामध्ये होत असते. पालकमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडो, ही कार्यकर्त्यांची इच्छा कधी पूर्ण होते, त्याचीच आता प्रतीक्षा आहे.
१९९५ पासून आमदार म्हणून निवडून येणारे गिरीश महाजन तसे भाजपामध्ये दुसºया फळीतील नेते राहिले. जामनेर तालुक्यावर वर्चस्व राखत असताना जिल्हा परिषदेची पक्षांतर्गत जबाबदारी यशस्वीपणे हाताळत राहिले. भाजपाचे सरकार येताच वादग्रस्त जलसंपदा खाते मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने त्यांच्याकडे सोपविले. आरोग्य खाते शिवसेनेकडे असल्याने वैद्यकीय शिक्षण हे खाते नंतर महाजनांकडे आले. या दोन्ही खात्यांचा खान्देशला पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
पब्लिसीटी स्टंट
कमरेला पिस्तूल लटकावून शाळेच्या कार्यक्रमाला जाणे, बिबट्याचा शोध घेण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन जंगलात फिरणे, बैलगाडीचे सारथ्य करीत जलपूजनाला जाणे, अपघातग्रस्त वाहनाचे चालकत्व स्विकारत वाहन बाजूला घेणे अशा कृती पब्लिसीटी स्टंट म्हणून माध्यमांमध्ये गाजल्या. प्रसिध्दी पलिकडे पोहोचलेल्या महाजन यांनी अशा कृती टाळायला हव्यात, असे हितचिंतकांना वाटते.
गिरीश महाजन यांचे स्वभाववैशिष्टय म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीशी सहज मैत्री साधू शकतात. मग तो रस्त्यावर उभा राहणारा सामान्य माणूस असो, कर्तव्य बजावत असलेला पोलीस कर्मचारी असो, आरोग्य चळवळीला अर्थसहाय्य करणारे टाटा, अंबानींसारखे उद्योगपती असो...महाजन सहजतेने संवाद साधतात. मैत्री जपतात. संघ संस्कार, विद्यार्थी परिषदेच्या मुशीत घडल्याने ‘मी’पणाची बाधा त्यांना झालेली नाही. आरोग्य दूतांची मोठी फळी उभारुन समाजऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न चालविला आहे.
- मिलींद कुलकर्णी

 

Web Title: Critical leader He is the commander of the Digvijayi commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.