८३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:08 PM2020-09-22T22:08:58+5:302020-09-22T22:09:04+5:30
भुसावळ तालुका : सतत झालेल्या पावसाने दिला ‘फटका’, सर्वाधिक नुकसान मूग आणि उडीदचे
भुसावळ : तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उडीद , मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेले आहेत. तर कपाशी , ज्वारी , सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अति पावसामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर निसर्गाने नांगर फिरविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुक्यात उडीद व मूग या पिकांचे पंचनामे करण्यात आले असून तालुक्यात एकूृण ८३३ हेक्टर क्षेत्रवरील उडीद, मूग व केळीचे नुकसान झाले आहे.
शासकीय अधिकाºयांनी या नुकसानीचे पंचनामे केल्यामुळे शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे . मात्र नुकसान भरपाई किती व कधी मिळते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती . मात्र उडीद व मुग फुलोरामध्ये येण्याची वेळ असताना पावसाने ओढ दिली. मात्र तरीही उडीद, मुगाचे पीक समाधानकारक येईल, अशी आशा शेतकºयांना होती. हे पीक ऐन तोडणीवर आले असताना पाऊस सुरु झाला. दररोजच्या पावसामुळे शेंगांना जागेवरच कोंब आले व जागेवरच सडले. त्यामुळे उडीद व मूग शेतकºयांच्या हातून पूर्णपणे निघून गेला, तरीही पाऊस सुरूच आहे . त्यामुळे कपाशीच्या कैºयाचेही नुकसान झाले आहे.
तर कापणीवर आलेल्या ज्वारी , मका , सोयाबीन या पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्यावर्षीही परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी उडीद , मूग, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तीच परिस्थिती पुन्हा दुसºया वर्षीही उद्भवली आहे.