पिकांची झाली लाही लाही, विहिरीतही पाणी नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:39 PM2020-08-08T15:39:01+5:302020-08-08T15:39:55+5:30
महिंदळे परिसरातील स्थिती बिकट: पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही कोरडेठाकच
महिंदळे, ता.भडगाव : अर्धा पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. नदी काठावरच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यातील नदी नाले खळाळून वाहत आहेत. परंतु महिंदळे परिसर मात्र याला पूर्णपणे अपवाद ठरत आहे. पावसाच्या सुरुवातीपासून परिसरावर पावसाची अवकृपा झाली आहे. आजतागायत एकही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे परिसरातील नाले अजून वाहिले नाहीत. परिणामी पाझर तलाव, केटीवेअर, विहिरी अजूनही कोरडे ठाक आहेत. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पिकांची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाची सुरुवातच परिसरात अडखळत झाली. शेतकºयांनी तुरळक पावसाच्या भरवशावर पिकांची पेरणी केली. तुरळक पावसामुळे पिकेही जोमदार होती. आता मात्र पिके मोठी झाल्यामुळे पिकांना दमदार पावसाची गरज आहे. पावसाने परिसरात गेल्या महिनाभरापासून डोळे वटारल्यामुळे पिकांनी पूर्ण माना टाकल्या आहेत. परिसरात एकही दमदार पाऊस नसल्यामुळे पिकांची पूर्ण वाढ खुंटली आहे.
पाऊस नसल्यामुळे खते घरात पडून
परिसरात अनेक शेतकºयांनी विहिरींच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमाने उन्हाळी कपाशी लागवड केली व काहींनी पावसाच्या पाण्यावर कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, भेंडी, व कडधान्ये लागवड केली आहे. पिके आता मोठी झाल्यामुळे त्यांना दमदार पावसाची आवश्यकता आहे. पिकांना वेळेवर खते व पाणी मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दमदार पाऊस येत नसल्यामुळे खते घरातच पडून आहेत.
श्रावण सरींनीही दाखवली पाठ
परिसरात श्रावण महिना अर्धा संपला तरी श्रावण सरी बरसल्या नाहीत. श्रावणात वातावरणात गारवा असतो परंतु सूर्यदेव कडक उन्हाच्या झळा ओकत आहे. पिकांची लाही लाही झाली आहे. परिणामी पिकांनी माना टाकल्या आहेत.