उमाळे, धानवड शिवारात पिके गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:43 PM2019-07-22T12:43:35+5:302019-07-22T12:44:42+5:30
जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून ...
जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये पंचनामे सुरू झाले आहे. कानळदा येथेही विजेच्या धक्क्याने गाय मृत्यूमुखी पडली. जामनेर (८३.५ मि.मी.) व चाळीसगाव (७०.१ मि.मी.) येथे अतिवृष्टी झाली.
गेल्या ११ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन झाले. मध्यरात्री एक वाजेपासून पावसाचा जोर वाढून पहाटेपर्यंत झालेल्या दमदार पावसाने उमाळे व धानवड परिसरात शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतातील कपाशी व इथर पिके वाहून गेली. अनेक ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली असून दगड-गोटेच शिल्लक आहे.
गाय मृत्यूमुखी
कानळदा येथे शेतात विजेच्या धक्क्याने एक गाय मृत्यूमुखी पडली. विजेच्या खांबाचा स्पर्श होऊन गायीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंचनामे सुरू
झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून तलाठी, कृषी सहायक शेतांमध्ये पोहचले.
सुभाषवाडीत वीज पडून बैल जोडी ठार
जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे २० रोजी रात्री झालेल्या पावसात वीज पडून बैलजोडी ठार झाली. प्रकाश पन्नालाल राठोड यांच्या खळ्यात ही घटना घडली.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
बळीराजावर पुन्हा संकट
जून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली. कशीबशी लागवड झाली व आहे त्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाऊस झाला व पेरण्या वाढल्या. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला. त्यानंतर शनिवारी रात्री पाऊस आल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र जोरदार पावसाने उमाळे, धानवड शिवारातील शेतांमध्ये होत्याचे नव्हते केल्याने बळीराजावर पुन्हा संकट ओढावले आहे.
विजेचा खांब कोसळला
शेतात पाणी शिरुन माती वाहून गेल्याने विजेचा खांबही उन्मळून पडला. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. सुदैवाने विजेचा खांब कोसळला त्या वेळी शेतात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.