जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 12:27 AM2021-03-21T00:27:36+5:302021-03-21T00:28:15+5:30

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.

Crops are lying in the district due to strong winds | जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

Next

जळगाव : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. शेतीचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.
आडगाव येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
आडगाव, ता. चाळीसगाव : शनिवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. साधारणतः सुपारीच्या आकासारखी गार पडली. यावेळी पाऊसही जोरात होता. पावसाने शेतात कापून ठेवलेला गहु, हरभरा झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. बहुतेक शेतकऱ्यांनी मक्याचे कणसे मोडून व चारा कापून ठेवल्याने कणीस ओले झाले व चाराही ओला झाला. ज्वारी, बाजरीच्या कणसांना दाणे नसल्याने त्याच्या पंचनाम्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी पुन्हा कृषी विभागाचे दार ठोठवावे लागेल की काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडू लागला आहे.
जामनेरात गारपीट
 
जामनेर : तालुक्यातील तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपिटीसह पाऊस झाला. गारपिटीमुळे शेतातील हरभरा, मका व ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जोरदार वाऱ्यासह वादळाने सुरुवात होत काही भागात पावसाबरोबर गारादेखील पडल्या. तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी या भागात दुपारी जोरदार वारा वाहू लागला. पावसाला सुरूवात होताच टपोऱ्या गारा पडायला सुरुवात झाली.
चाळीसगाव परिसराला अवकाळीने झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अवकाळी पावसाने चाळीसगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले. गारपिटीचा माराही झाला. या अवकाळी धूमशानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सकाळपासूनच वातावरण काहीसे ढगाळ होते. दुपारी उकाडाही वाढला होता. दुपारी साडेचार वाजता ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोराचा वारा आणि वादळी पावसाने सर्वत्र एकच धावपळ उडाली. गोटीच्या आकाराची गारपीटही झाली.  वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील काही झाडे पडली, फांद्याही पडून आल्या. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर आले होते.
रावेरसह अनेक तालुक्यात वादळी पावसाचे तांडव
रावेर : शहरासह तालुक्यात सायंकाळी पावणेसात वाजेपासून आभाळ भरून आल्याने विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने तांडव घातल्याने ऐन कापणीवरील केळीबागा, मळणीसाठी कापून पडलेली वा उभी गहू, हरभरा, मक्याच्या उत्पादनाची वादळ-पावसात धूळधाण होऊन अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी पावसात वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुका अंधारात बुडाला आहे.

Web Title: Crops are lying in the district due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.