तापीतटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:00+5:302021-05-28T04:14:00+5:30
रावेर : तालुक्यातील उत्तरेला सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील ऐन हातातोंडाशी ...
रावेर : तालुक्यातील उत्तरेला सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील ऐन हातातोंडाशी आलेल्या कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त केल्या. यात कोट्यवधी रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या परिसरातील शेकडो लोकांच्या घरावरील तथा शेतमालाच्या गोदामांवरील टीनपत्र्याचे छत उडून वादळात बेपत्ता झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे.
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या मोहगण, अहिरवाडी व पाडळे शिवारातील केळीबागा वायव्येकडून आग्नेय दिशेला जाणाऱ्या वादळी पावसाच्या तडाख्यात भुईसपाट झाल्याने नुकसान झाले. मात्र, काही मिनिटांचा तो क्षणिक ट्रेलर मंगळवारी दाखवत गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास मात्र तापीकाठच्या विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसासह तुफान वादळी वाऱ्यांच्या अकांडतांडवात खिर्डी, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, कोळदा, ऐनपूर, निंबोल, विटवे, निंभोरासीम या गावशिवारातील अंदाजित सुमारे तीन ते चार हजार हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या.
या तुफान वादळी पावसाचा आवेग एवढा भयावह होता की, या परिसरातील ग्रामीण रस्त्यांवर व शेतीशिवारात मोठमोठे वृक्ष उन्मळून तथा वीजखांब व वीज ट्रान्सफॉर्मर कोलमडून पडले. परिणामी, या तापी काठावरील प्रभावित गावांना जोडणा-या ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तुफान वादळासह मुसळधार पावसामुळे तापीकाठच्या या गावांमधील असंख्य घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने अनेकांो संसार उघड्यावर पडले आहे. अनेक शेतक-यांच्या शेतमालाच्या गोदामांची आच्छादने उडून गेल्याने शेतमालाचे भिजून नुकसान झाले आहे.
महावितरणचे वीजखांब व वीज ट्रान्स्फॉर्मर कोलमडून पडल्याने तथा वीजतारा खंडित झाल्याने लाखो रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या आपद्ग्रस्त भागातील वीजपुरवठा व पर्यायाने नळपाणीपुरवठा योजना ठप्प पडून अंधाराच्या काळोखाचे सावट पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करून गावागावांतील गावठाण फिडर सुरू करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेतली आहे.
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले पंचनाम्यांचे आदेश
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी शुक्रवारपासून तापीकाठच्या या वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतीगटातील शेतमालाच्या नुकसानीचे व घरांच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून करण्याचे आदेश दिले आहेत. पं.स. सदस्य जितेंद्र पाटील यांनी शेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज
गतवर्षी वेगवान वा-यामुळे झालेल्या नुकसानीचे संरक्षित विम्याची रक्कम विमा कंपनीने विहीत मुदत कालबाह्य होऊनही आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यासंबंधी कर्तव्यात कसूर केला असल्याने केळी उत्पादक शेतकऱी आर्थिक संकटात सापडला आहे. तोच आज पुन्हा वादळी पावसाच्या तडाख्यात हजारो हेक्टर केळी भुईसपाट झाली आहे. विमा कंपनीने तातडीने पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करून विहीत मुदतीत संरक्षित विम्याची रक्कम अदा करण्याबाबत व गतवर्षीच्या संरक्षित विम्याच्या थकीत रकमा सव्याज अदा करण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.