पारोळ्यात भरवस्तीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 06:51 PM2019-05-03T18:51:07+5:302019-05-03T18:51:12+5:30
नगराध्यक्ष यांच्या स्विय सहाय्यकाचे घर झाले लक्ष
पारोळा -शहरात भरवस्तीत गुरव गल्लीतील रहिवासी व नगराध्यक्ष यांचे स्विय सहाय्यक कैलास नाना पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडून ५० हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी ३ रोजी पहाटे केली. चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. याचबरोबर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. चोरीच्या वेळी गुंगीचा स्प्रे वापरला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
कैलास पाटील यांचे घर भरवस्तीत आहे. रात्रभर या रस्त्यावर वर्दळ चालू असते. तरी चोरट्यांनी धाडस करून घरफोडी करणे म्हणजे पोलिसांचा रात्रीच्या गस्तीला हे एक आव्हानच म्हणावे लागेल. ३ रोजी पहाटे कैलास पाटील कुटुंबासह घरात झोपले असतांना. चोरट्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत कैलास पाटील यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख १३हजार रुपये व त्यांचा २७ हजारांचा मोबाईल तसेच त्यांच्या पत्नीचा १२ हजाराचा मोबाईल , घडयाळ ५ हजार रुपये किंमतीची तसेच किरकोळ ३ हजाराचे साहित्य असा एकूण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करीत कपाटात पैसे व दागिन्यांची शोधाशोध केली.
कैलास पाटील हे घरातील पाहिल्याच रुममध्ये झोपले होते त्यांना ओलांडून हे चोरटे घरातील दुसऱ्या रुममध्ये गेले. तरीही त्यांना जाग आली नाही. याप्रकरणी पोरोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सध्या एक रात्र अशी जात नाही की शहरात चोरी झाली नाही. शहराला लागलेले चोरीचे हे ग्रहण केव्हा सुटणार असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. एका बाजूला दोन डझनभर पोलीस रात्रीच्या गस्त साठी लावण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी घरफोडया होतच आहेत. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांचा पाहिजे तसा वचक अजूनही निर्माण झाला नाही. या आधी या पोलीस ठाण्यात दिवंगत पोलिस निरीक्षक वाय. डी. पाटील, हिंमतराव देसाई, गणेश मोरे यांच्या नावात दरारा होता. मात्र अलीकडे महिनाभरात धाडसी घरफोडीसह अनेक दुकानात पत्रा कापून चोरी झाली. पण एकाही चोरीचा तपास लागला नाही.