राष्ट्रीय महामार्गाभोवती अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:10+5:302021-08-29T04:19:10+5:30
पाचोरा शहरातून गेलेल्या या महामार्गावर जळगाव चौफुलीपासून ते निर्मल सीड्स कंपनीपावेतो दुतर्फा अनेकांनी स्वमालकीची जागा समजून दुकाने थाटण्यास सुरुवात ...
पाचोरा शहरातून गेलेल्या या महामार्गावर जळगाव चौफुलीपासून ते निर्मल सीड्स कंपनीपावेतो दुतर्फा अनेकांनी स्वमालकीची जागा समजून दुकाने थाटण्यास सुरुवात केली असून बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स टाकण्याचे सोडून काही व्यावसायिकांना लाभ होईल, अशा पद्धतीने महामार्ग ठेकेदाराने जागा सोडल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या बातम्या येत आहेत.
पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर तर चक्क चौकात जि.प. प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ महामार्गाला लागून विनापरवानगी पक्के बांधकाम चालू असून कोणत्याही यंत्रणेचे लक्ष दिसून येत नाही.
अतिक्रमणे अपघाताला निमंत्रण
महामार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत असतात. अशावेळी महामार्गालगत असलेल्या दुकान हॉटेल्स व इतर टपऱ्यांवर वस्तू घेण्यासाठी अथवा खरेदीसाठी भरधाव वाहन थांबवून व्यवहार करण्यास सुरुवात होईल. यामुळे इतर वाहनांना याचा त्रास होऊन अपघातात वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच रस्त्यावरील अतिक्रमित दुकानासमोर वाहने मध्येच बेकायदेशीर थांबविल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तातडीने राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा होत असलेले अतिक्रमण हटवावे व अशा अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमणधारकांवर राजकीय वरदहस्त
अतिक्रमणधारकांवर राजकीय वरदहस्त असल्याने अतिक्रमणे वाढत असून कोणत्याही परवानगीशिवाय वाट्टेल तसे अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. काहींनी तर जागेवर हक्क दाखवून परस्पर पोटभाडेकरू म्हणून जागा दिल्याचेही बोलले जात आहे.
प्रतिक्रिया
केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करून वाहतुकीचा प्रश्न सोडविला. मात्र महामार्गाच्या दुतर्फा होत असलेले बेकायदेशीर अतिक्रमणामुळे मोठ्या दुर्घटना अपघाताला निमंत्रणच मिळणार आहे. तेव्हा संबंधित यंत्रणेने अतिक्रमणे काढून कारवाई करावी व सर्वत्र बॅरिकेड्स टाकाव्यात.
-ज्ञानेश्वर सोनार, पंचायत समिती सदस्य