लॉकडाऊनमध्ये लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:12+5:302021-04-24T04:16:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरुवारी रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन घोषित झाले असून यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू राहणार ...

Crowd erupts at vaccination center in lockdown | लॉकडाऊनमध्ये लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी

लॉकडाऊनमध्ये लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गुरुवारी रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन घोषित झाले असून यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू राहणार आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. यात अनेक नागरिक सकाळी ७ वाजेपासून आल्याने नंबर लागत नसल्याने संताप व्यक्त करीत होते. केंद्रापासून तर थेट गेटपर्यंत गर्दी उसळली होती.

सद्य:स्थितीत ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, यात लसींचा पुरवठा हवा तसा होत नसल्याने लसीकरणात खंड पडत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी, जळगाव शहरातील सर्वच केंद्रे बंद होती. त्या काळातील गर्दी आता केंद्रावर होत असल्याचे सांगितले जात आहे. शहरात लसीकरणाचे शाहू महाराज रुग्णालय, रोटरी भवन, रेडक्रॉस रक्तपेढी, नानीबाई रुग्णालय, डीबी जैन रुग्णालय या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने या लसीकरणावर बंधने येत असल्याचे चित्र आहे. या डोसच्या अनियमिततेमुळे आता केंद्रांवर गर्दी उसळली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले असून त्यांचीही केंद्रावर गर्दी होत आहे. दरम्यान, केंद्रावर मात्र योग्य मार्गदर्शन होत नसल्याने सलग तीन दिवसांपासून आम्हाला लसीकरणाला यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. आम्ही सकाळी ७ वाजेपासून आलोय, मात्र आमचा नंबर लागत नसून आता एका दिवसात केवळ ७० लोकांनाच डोस दिला जातो, असे सांगून लसीकरण संपल्याचे सांगितले जात असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे होते.

दोन दिवसांत २५ हजार डोस येणार

बुधवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी कोविशिल्ड लसीचे ९ हजार ६४० डोस जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. गुरुवारी सकाळी व शुक्रवारी सकाळी ते केंद्रांना वाटप करण्यात आले. या आठवड्यात आधी १३ हजार आणि नंतर ९ हजार डोस प्राप्त झाले होते. दरम्यान, येत्या एक, दोन दिवसांत कोविशिल्ड लसीचे २५ हजार डोस प्राप्त होणार असल्याची माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली.

केंद्रे वाढविण्याची होतेय मागणी

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार असून यात गर्दी उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मात्र, यासाठी शासकीय पातळीवर असलेली १३३ केंद्रे सद्य:स्थितीत पुरेशी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असून जी खासगी रुग्णालये लसीकरण करण्यास इच्छुक असतील, त्यांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.

Web Title: Crowd erupts at vaccination center in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.