उत्तर कार्यासाठी तापी-पूर्णा संगमावर होणारी गर्दी कोरोनामुळे निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:20 PM2020-07-26T16:20:09+5:302020-07-26T16:22:44+5:30
यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून पौराहित्य व्यवसाय ठप्प असल्याचे चित्र आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीत पौराहित्याला मोठे महत्व आहे. पाठोपाठ व्रत वैकल्य आणि धार्मिक विधी पुण्यकार्यासाठी श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशात विविध धार्मिक कार्यासाठी पुरोहितांची पौरोहित्य करण्यामोठी मागणी असते. परंतु यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून पौराहित्य व्यवसाय ठप्प असल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध विधी करण्यास लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग यामुळे पौराहित्य यावर बंधने आली असल्याने पौराहित्य करून घेण्याची इच्छा असली तरी ते करता येत नाही अशी स्थिती आहे.
पवित्र नद्या व संगमावर अस्थी विसर्जनास मोठे धार्मिक महत्व आहे. मृतात्म्यास शांती लाभण्यास त्यांच्या अस्थीचे विसर्जन पवित्र नद्या व संगमावर अस्थी विसर्जनास मोठे धार्मिक महत्व आहे. या अनुषंगाने तालुक्यातील चांगदेव येथे पवित्र तापी पूर्णा नदी संगमावर अस्थी विसर्जन आणि उत्तरकार्य विधीसाठी जिल्हा व जिल्हाबाहेरील नागरिक येतात. मृत्यू पावलेल्या अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांचे अस्थी विसर्जन येथे होत असतात. परंतु कोरोना काळात संगमावर अस्थी विसर्जनासाठी नागरिक येतच नसल्याचे संगमावर शुकशुकाट आहे. त्यामुळे येथील पौरोहित्य बंद आहे. कोरोनाने धार्मिक विधी विधान पूर्ण करण्यावरही संकट आणले आहे.
कोरोना संकटात लॉकडाउनमुळे वाहन व्यवस्था आणि पासेसची सक्ती यामुळे बाहेरील यजमान वेगवेगळ्या विधी करण्यास पवित्र तापी पूर्णा संगमावर येण्यास मोठी अडचण आहे. सध्या लोक घराबाहेरही पडत नाही. सुरक्षा म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास घरीही धार्मिक विधी टाळत आहे. यामुळे पौराहित्य कार्य अत्यल्प प्रमाणात केले जात आहे.
-अनिल कुलकर्णी, पुरोहित, चांगदेव, ता.मुक्ताईनगर