शिथिलतेनंतर गर्दीने फुलले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:07+5:302021-06-09T04:21:07+5:30
भुसावळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने सोमवारी बाजारपेठेत ...
भुसावळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने सोमवारी बाजारपेठेत चैतन्य परतले. मात्र, सर्व प्रतिष्ठानांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे. त्याकडे स्थानिक प्रशासनाची करडी नजर आहे.
खरेदीसाठी एकच गर्दी
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात चार महिन्यांपासून संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत कित्येकांचे रोजगार हिरावले. या सर्व चेहऱ्यांवर आता हास्य फुलले आहे. महिनाभरापासून बंदच असलेल्या बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये आवश्यक खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. व्यापारी वर्गानेही जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दुसऱ्या लाटेचे थैमान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. फेब्रुवारीपासून शहरासह तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आर्थिक चक्र विस्कटले होते; मात्र ७ जूनला प्रशासनाने व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे बाजारात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पण अनेकांना कोरोनाचा विसर पडला की काय, असेही चित्र दिसून येत आहे.
शिथिलता शासनाने दिली कोरोनाने नव्हे!
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर जसजसे रुग्ण कमी होत गेले त्यामुळे कोरोना संपला की काय, असे मुक्तसंचार नागरिकांकडून झाल्यामुळे व कोरोना नियमाची पायमल्ली झाल्यामुळे दुसऱ्या लाटेने जोरदार कमबॅक केले. यातच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. हळूहळू रुग्ण संख्या कमी होत असताना शासनाने गेल्या काही महिन्यापासून असलेली संचारबंदी व कडक निर्बंधात शिथिलता जारी केली. याचा अर्थ कोरोना संपलेला नाही. शिथिलता शासनाने दिली कोरोनाने नव्हे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे.
होमगार्ड सांगून सांगून दमले
दरम्यान, बाजारात बहुतांश ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर नियंत्रणासाठी ठेवण्यात आलेले होमगार्ड नागरिकांना सांगून सांगून दमल्यानंतर कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्याचे दिसून आले.
बिगर जीवनावश्यक दुकानांमध्ये जास्त गर्दी
संचारबंदीत शिथिलता झाल्याच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक तसेच बिगर जीवनावश्यक आस्थापना, प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यामध्ये रेडिमेड कापडांची दुकाने, स्टेशनरी, सलून, बूक स्टॉल आदी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सकाळच्या वेळी दुकानांची स्वच्छता सुरू असल्याचे दिसून आले. तर काहींची वेळेच्या आत व्यवसाय आटोपण्याची लगबग सुरू होती.
कोट
रुग्णसंख्या कमी होत असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. पुन्हा लॉकडाऊन नको असल्यास नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर निघू नये, गर्दी करू नये. त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे आहे.
-संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ
बाजारपेठ सुरू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. दरम्यान, व्यवसाय करण्याची मुभा मिळाली. पूर्णपणे ठप्प असलेली आर्थिक गाडी रुळावर येईल. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होती. कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
- शोएब बागवान, फळविक्रेता
नये कपडे हवेच. याबाबत मुलांनी हट्ट धरला होता. त्यामुळे मंगळवारी लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठ गाठली. कोरोना नियमावलीचे भान ठेवावे लागेल. चैतन्याची ही स्थिती यापुढेही कायम राहावी, ही अपेक्षा आहे.
- माधुरी पाटील, गृहिणी
अवलोकन करता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्षभराचे टार्गेट पूर्ण करणारा लग्नसोहळा व ईद या दोन मोठ्या संधी गमाविल्या गेल्या आहेत. दोन वर्षांपासून ही स्थिती ओढवलेली आहे.
-निर्मल कोठारी, घाऊक व्यापारी
दोन महिन्यांनंतर आता दुकाने उघडल्यानंतर व्यापारी वर्गाला बरे वाटत आहे. कर्मचारीही सुखावले आहेत. मात्र, आमचा लग्नसराईचा धंदा बुडाला. आम्ही किमान तीन वर्षे मागे गेलो. यात दुकानदार, व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मोठे नुकसान झालेले आहे.
-किरण महाजन, कापड विक्रेता