‘वीकेंड’ बंदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:21+5:302021-07-03T04:12:21+5:30
जळगाव : डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार ...
जळगाव : डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याने शुक्रवारी विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. या दोन दिवस अत्यावश्यक वगळता इतर व्यवसायांना परवानगी नसल्याने शालेय उपयोगी, इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल, बांधकाम, रंगकाम इत्यादी साहित्याची जादा खरेदी करून ठेवण्यात आली. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा असणारे व्यवसाय शनिवार, रविवार सुरू राहणार असले तरी त्या साहित्याच्याही खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे वळल्याने गर्दीत भर पडली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यातून थेट तिसऱ्या टप्प्यात गेला व पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह इतर सर्वच व्यवसाय दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. तसेच शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना परवानगी नाकारण्यात आली. या आदेशानंतर वीकेंडला येणारा शनिवार ३ जुलै रोजी पहिलाच वार येत असल्याने या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार, २ जुलै रोजी खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.
विविध साहित्याची खरेदी
सध्या बांधकाम व्यवसायाला परवानगी आहे. मात्र शनिवार, रविवार बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहत असल्याने शुक्रवारी हे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसून आली. या सोबतच हार्डवेअर दुकानांवरदेखील चांगलीच ग्राहकी होती. वीकेंडला शहरातील मोठे संकुल असलेले महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतरही संकुल बंद राहणार असल्याने फुले मार्केटमध्ये कापड खरेदी, गोलाणी मार्केटमध्ये मोबाइल व दुरुस्तीसाठी लगबग होती. चित्रा चौकात तर इलेक्ट्रीकल साहित्याच्या खरेदीसाठी देखील ग्राहकी वाढली. या परिसरातून जिल्हाभरात इलेक्ट्रीकल साहित्य पोहोचते. त्यामुळे जिल्हाभरातील खरेदीदार येथे आले होते.
या सोबतच प्रत्यक्षात शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने वह्या, पुस्तके, गाईड, पेन व इतरही साहित्याची मुलांकडून मागणी होत असल्याने पालकवर्ग हे साहित्य अगोदरच खरेदी करून ठेवत आहे.
किराणा साहित्याच्या ग्राहकांची भर
शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार असली तरी सुट्टीच्या दिवशी गावात जाणे टाळता यावे म्हणून अनेकांनी शुक्रवारीच किराणा साहित्याच्या खरेदीसाठीदेखील गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीत अधिकच भर पडली.