रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:59+5:302021-08-22T04:20:59+5:30
जळगाव : भाऊ-बहिणीमधील स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यंदाही ...
जळगाव : भाऊ-बहिणीमधील स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यंदाही बाजारपेठेत पारंपरिक राख्यांसह फॅन्सी राख्यांना महिलावर्गाची मोठी मागणी दिसून आली.
गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे, महिलांना घरी राहून रक्षाबंधन साजरे करावे लागले होते. मात्र, यंदा शासनाने जूनपासून टप्प्या-टप्प्याने अनलॉक करीत, १५ ऑगस्टपासून तर पूर्णपणे अनलॉक केला आहे. तसेच आता रेल्वे आणि बससेवाही पूर्ववत सुरू झाल्यामुळे यंदा सर्वत्र रक्षाबंधनाच्या उत्साह संचारलेला दिसून आला. दरम्यान, शनिवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. टॉवर चौक, चौबे मार्केट, फुले मार्केट, सुभाष चौक या भागातील बाजारपेेठेत राखी खरेदीसाठी कपडे, ज्वेलरी, भांडे व मिठाईंच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. सायंकाळी सहानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने, शहर वाहतूक शाखेतर्फे टॉवर चौकापासून ते पुढे चौबे मार्केटपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले होते.
इन्फो :
भरपावसातही खरेदीचा उत्साह
शनिवारी सकाळपासून विश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे दुपारनंतर मात्र आगमन झाले. जाेराने पाऊस नसला तरी, पावसाची रिमझिम सायंकाळपर्यंत सुरूच होती. मात्र, अशा पावसातही महिलांची खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. बाजारपेठा बंद होईपर्यंत ही गर्दी कायम होती.