मेहरुण तलाव व बाजार समितीमधील गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:01+5:302021-05-07T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. एकीकडे शहरातील मुख्य बाजारपेठ व चौकाचौकांमध्ये ही कारवाई केली जात असताना दुसरीकडे शहरातील मेहरूण तलाव परिसर व बाजार समिती भागात दररोज शेकडो नागरिकांची गर्दी होत असताना त्यांना सवलत का? असाही प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी भाजीपाला मार्केट परिसरात हजारो नागरिकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे या गर्दीमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे कोणतेही पालन केले जात नाही. यासह अनेक विक्रेते व ग्राहकदेखील तोंडावर मास्क न घालताच या ठिकाणी फिरत असल्याचेही आढळून येते. विशेष म्हणजे सकाळी ११ वाजेनंतर देखील बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट समोरील प्रवेशद्वारासमोर अनेक विक्रेते दुकाने देखील थाटत असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे. मात्र या ठिकाणी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक किंवा पोलिसांच्या पथकाकडून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही. शहरातील मुख्य चौकांमध्ये थांबून नागरिकांची अँटिजन टेस्ट केली जात आहे. मात्र बाजार समितीच्या ठिकाणी हजारो नागरिकांची गर्दी एकाच वेळी होत असतानाही या ठिकाणी अँटिजन टेस्ट कॅम्प आयोजित का केला जात नाही? असाही प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मेहरूण तलाव परिसरात जॉगिंग करण्यासाठी नागरिकांची गर्दी
मेहरूण तलाव परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी शेकडो नागरिक जॉगिंग करण्यासाठी येत आहेत. या ठिकाणीदेखील कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना विनामास्क असणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र मनपा प्रशासनाकडून या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. प्रशासनाने वेळीच या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.